(नाशिक / प्रतिनिधी)
भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र गोवर्धन मथुरा येथे विश्व कल्याणासाठी श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे २७ जून २०२५ पासून श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपिठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांनी दिली.
गुरुपुत्र श्री. मोरे यांनी या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, सेवामार्गातर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री.आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने बहुविध सामाजिक उपक्रमाचे सातत्यपूर्ण आयोजन करण्यात येते. याच उद्देशाने हा आध्यात्मिक उपक्रम घेण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे श्री क्षेत्र गोवर्धन,गिरीवर व मुकुंद विनोद गार्डन, बडी परिक्रमामार्ग या ठिकाणी भागवत सप्ताह घेण्याचे निश्चित झाले आहे. भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत सात दिवस आपल्या बोटावर धारण करून संपूर्ण जीवसृष्टीचे संरक्षण केले होते. याच श्रीगोवर्धन पर्वताच्या सान्निध्यात उच्चतम भागवत सप्ताह होणार आहे. कोणत्याही आपत्ती पासून जीवसृष्टीचे रक्षण आणि विश्व कल्याणासाठी परमपूज्य गुरुमाऊलींच्या सान्निध्यात श्रीमद् भागवत पारायण करण्याची दैवदुर्लभ संधी सेवेकऱ्यांना यानिमित्ताने प्राप्त झाली आहे असे श्री मोरे यांनी स्पष्ट केले.
भागवत सप्ताह काळात विशेष सेवा व उपक्रम
भागवत सप्ताह काळात भागवत ग्रंथाची मिरवणूक, पितृतर्पण, प्रधान संकल्प, नारायण कवच धारण विधी, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोपाळ मंत्रानुष्ठान, श्रीकृष्ण दोलोत्सव, कन्या विवाहकारक पूजन, गोवर्धन पूजन, श्रीकृष्ण रुक्मिणी कल्याण उत्सव, श्री दत्तात्रय पूजन, श्री कात्यायनी पूजन, श्री सत्यनारायणाची महापूजा, श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन, विष्णू महायाग असे उपक्रम होणार आहेत. सांगतेच्या दिवशी परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांचे अमृततुल्य हितगुज आणि गोपाळकालासह महाप्रसादाचे वाटप होऊन भागवत सप्ताहाची श्रद्धापूर्वक सांगता होईल अशी सविस्तर माहिती श्री नितीनभाऊ मोरे यांनी दिली.