(नवी दिल्ली)
डायबिटीज रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. सिपला या अग्रगण्य औषध कंपनीने श्वासाद्वारे घेता येणाऱ्या ‘अफ्रेजा’ (Afrezza) या रॅपिड अॅक्टिंग इन्हेल्ड इन्सुलिनच्या भारतातील लॉन्चची घोषणा केली आहे. या औषधाला केंद्रीय औषध मानके नियंत्रण संघटना (CDSCO) कडून वितरण आणि विपणनासाठी मंजुरी मिळाली आहे.
आतापर्यंत इन्सुलिनची गरज असलेल्या रुग्णांना इंजेक्शनद्वारे इन्सुलिन घ्यावे लागत होते. मात्र अफ्रेजामुळे आता इंजेक्शनच्या सुईपासून सुटका मिळणार आहे. हे इन्सुलिन पावडर स्वरूपात असून एका छोट्या इन्हेलरच्या माध्यमातून थेट श्वासाद्वारे शरीरात जाते.
भारतात सध्या १० कोटीहून अधिक लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. त्यापैकी सुमारे १० लाख रुग्ण टाईप-१ डायबिटीजचे आहेत, ज्यांना नियमित इन्सुलिनची सर्वाधिक गरज असते. टाईप-२ डायबिटीजच्या अनेक रुग्णांनाही पुढील टप्प्यावर इन्सुलिन आवश्यक ठरते. वाढती रुग्णसंख्या ही गंभीर बाब मानली जात आहे.
इन्सुलिनचा वापर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी केला जातो. सिपलाने आणलेले अफ्रेजा हे रॅपिड अॅक्टिंग असल्याने जेवणानंतरच्या ब्लड शुगर नियंत्रणात ते अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणानुसार सिंगल-यूज कार्ट्रीज इन्हेलरमध्ये बसवून रुग्ण हे औषध सहज घेऊ शकणार आहेत.
CDSCO कडून मंजुरी
सिपलाला या इन्हेल्ड इन्सुलिन पावडरसाठी CDSCO कडून अधिकृत मंजुरी मिळाली असून लवकरच हे औषध भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. या औषधाच्या जाहिरातीसाठीही कंपनीला परवानगी देण्यात आली आहे.
कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, अफ्रेजामुळे डायबिटीज रुग्णांचे दैनंदिन उपचार अधिक सोपे होणार असून इंजेक्शनमुळे होणारा त्रास आणि भीती कमी होण्यास मदत होईल. डायबिटीज उपचार क्षेत्रात हा एक महत्त्वाचा बदल मानला जात आहे.

