(मुंबई)
बदलापूर येथे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नव्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार आता प्रत्येक विद्यार्थ्याची हजेरी दिवसातून तीन वेळा नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळांवर सोपवण्यात आली आहे.
न्यायालयाच्या आदेशावरून समिती स्थापन
या संदर्भात, न्यायालयाच्या निर्देशानुसार माजी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने दिलेल्या शिफारशींनुसार शालेय शिक्षण विभागाने खालीलप्रमाणे कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत:
मुख्य सूचना व उपाययोजना:
1. सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य
-
शाळा व परिसरातील प्रवेशद्वारे, कॉरिडॉर, वर्गांचे दरवाजे, मैदान, स्वच्छतागृहाबाहेर, मुख्य गेट इ. मोक्याच्या ठिकाणी पुरेशा संख्येने CCTV कॅमेरे बसवणे बंधनकारक.
-
किमान एक महिन्याचे फुटेज बॅकअप असणे आवश्यक.
-
या नियमांचे पालन न केल्यास संबंधित शाळेविरोधात कारवाई करण्यात येईल.
2. कर्मचाऱ्यांची चारित्र्य व पार्श्वभूमी पडताळणी
-
प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणुकीपूर्वी पोलीस खात्याकडून चारित्र्य पडताळणी बंधनकारक.
-
नेमणुकीनंतर संपूर्ण माहिती व छायाचित्र स्थानिक पोलीस यंत्रणेकडे सादर करणे आवश्यक.
-
CCTNS (Crime and Criminal Tracking Network Systems) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करावा.
-
गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळल्यास तात्काळ सेवामुक्त करावे.
3. स्वच्छतागृह व्यवस्थापन
-
मुली व मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत.
-
मुलींसाठी महिला परिचर आणि मुलांसाठी पुरुष परिचर नेमावा.
-
पाणी व वीज सुविधा, स्वच्छता आणि आणीबाणीसाठी घंटा अथवा बजर आवश्यक.
4. शाळेतील वाहतूक व उपहारगृह कर्मचारी
-
वाहतूक, गृहव्यवस्थापन, उपहारगृहातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती मान्यताप्राप्त संस्थेमार्फत करावी.
-
सर्व कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणी आवश्यक.
5. शाळेचा प्रवेश व सुरक्षा व्यवस्था
-
शाळेभोवती सुरक्षित कुंपण / भिंत आणि नियंत्रित प्रवेशद्वार असावा.
-
मुख्य गेटवर सुरक्षा रक्षकांची नेमणूक आवश्यक.
-
कोणतीही अनधिकृत व्यक्ती शाळेत प्रवेश करू नये.
6. हजेरी पद्धतीत बदल
-
हजेरी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी (शाळा सुटताना) नोंदविणे बंधनकारक.
-
अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना SMSद्वारे माहिती द्यावी.
7. समुपदेशन सेवा
-
प्रशिक्षित समुपदेशकांची नियुक्ती खाजगी (स्वयंअर्थसहाय्यित) शाळांमध्ये अनिवार्य.
-
विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव येऊ नये म्हणून समुपदेशन व्यवस्था बंधनकारक.
8. ‘चांगला आणि वाईट स्पर्श’बाबत प्रबोधन
-
पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तरावर ‘Good Touch – Bad Touch’ बाबत प्रात्यक्षिके व मार्गदर्शन दिले जावे.
9. बाल हेल्पलाइन आणि जनजागृती
-
टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 1098 शाळेतील प्रमुख ठिकाणी स्पष्टपणे प्रदर्शित करावा.
-
या क्रमांकाचा वापर कधी आणि कसा करायचा याचे प्रबोधन मुलांना द्यावे.
-
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत फलक, चित्रफीत, डिजिटल डिस्प्ले यांचा वापर करावा.
10. शाळा स्तरावर नियमित सुरक्षा आढावा
-
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत सुरक्षा संदर्भात बैठकांचे आयोजन करावे व आवश्यक उपाययोजना कराव्यात.
या नवीन नियमावलीमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस अधिक बळ मिळणार असून, नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

