( मुंबई )
रेल्वेच्या तत्काळ तिकिट बुकिंगसंदर्भात प्रवाशांची तक्रार दिवसेंदिवस वाढताना दिसते. बुकिंग सुरू होताच काही सेकंदांतच सर्व तिकिटे ‘वेटिंग लिस्ट’मध्ये जातात, आणि सामान्य प्रवाशांना तिकिट मिळणे जवळपास अशक्य होते. याबाबत एका प्रवाशाने थेट एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर आयआरसीटीसीला प्रश्न विचारला आणि त्यावर IRCTCने अधिकृत उत्तर दिलं आहे.
प्रवाशाची तक्रार – “बुकिंग सुरूच नाही, तरी तिकीट वेटिंगमध्ये?”
सोनू निगम सिंग या युजरने एक्सवर दोन स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, “गरीब रथ ट्रेनमध्ये तत्काळ कोट्यात २४० सीट्स होत्या. सकाळी १०.०१ ला ‘बुकिंग सुरू नाही’ असा मेसेज दिसतो, ॲप क्रॅश होतं आणि काही वेळात बफरिंग सुरू होतं. १०.०४ ला पाहतो तोपर्यंत माझी बुकिंग स्थिती थेट वेटिंग ४१ दाखवते.” त्यांनी हेही विचारलं की, “हाय स्पीड इंटरनेट असूनही मला तिकीट मिळत नाही, पण एजंट कसं काय खात्रीने तिकीट मिळवतात? हेच समजत नाही.”
IRCTC काय म्हणाले?
IRCTC ने यावर उत्तर देताना स्पष्ट केलं की,
“तत्काळ बुकिंगच्या वेळी अत्यंत मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी युजर्स सिस्टिमवर लॉग-इन होतात. त्यामुळे काही सेकंदांतच सीट्स भरतात. सर्व बुकिंग विनंत्या एकाच वेळी प्रोसेस होत असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. आम्ही युजर्सना अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी सतत सुधारणा करत आहोत.”तत्काळ बुकिंग वेळा काय आहेत?
- एसी कोचसाठी: दररोज सकाळी १०:०० वाजता
- स्लीपर कोचसाठी: दररोज सकाळी ११:०० वाजता
तत्काळ तिकीट बुक करताना ‘हे’ टिप्स लक्षात ठेवा:
- लॉग-इन वेळ योग्य ठेवा: बुकिंगच्या ३-५ मिनिटे आधी लॉग-इन करा. फार लवकर लॉग-इन केल्यास सेशन संपण्याचा धोका असतो.
- ‘मास्टर लिस्ट’ तयार ठेवा: आयआरसीटीसी पोर्टलवर प्रवाशांची माहिती आधीपासून सेव्ह ठेवा, जेणेकरून वेळेची बचत होईल.
- पेमेंटसाठी IRCTC eWallet वापरा: UPI किंवा बँक गेटवेऐवजी eWallet वापरल्यास पेमेंट वेळ कमी होतो आणि तिकिट मिळण्याची शक्यता वाढते.
तत्काळ तिकीट मिळवणं हा एक वेगवान स्पर्धेचा खेळ झाला आहे. IRCTC त्यांच्या प्रणालीमध्ये सुधारणा करत असल्याचा दावा करत असले तरी, सामान्य प्रवाशांना अजूनही या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि सुलभता हवी आहे, हे मात्र नक्की!