(चिपळूण)
चिपळूण-कराड मार्गावरील खेर्डी येथील दसमान कॉम्प्लेक्ससमोर बुधवारी सायंकाळी डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका 26 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत महिला समिना नासिर चिपळूणकर या खेर्डी मोहल्ला येथील रहिवासी होत्या. त्यांचा दफनविधी आज (गुरुवारी) सकाळी 10.30 वाजता होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, समिना चिपळूणकर आपल्या वडील आदमभाई अब्दुल गफूर चौगुले यांच्या सोबत दुचाकीवरून प्रवास करत होत्या. खेर्डी बाजारपेठ नजीक असलेल्या दसमान कॉम्प्लेक्ससमोर असताना त्यांच्या दुचाकीला एका डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत समिना डंपरच्या चाकाखाली आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.
तत्काळ त्यांना उपचारासाठी कामथे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातात त्यांचे वडील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.