( चिपळूण )
मुंबई महानगर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्य घटनेवर आधारित आता थांबायचं नाय, हा सिनेमा शहरातील अतिथी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी नाटक कंपनी चिपळूणने नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना विनामूल्य हा प्रयोग दाखवून एक वेगळा आदर्श घालून दिला. हा सिनेमा सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेला.
दुपारी अडीच व सायंकाळी साडेसात, असे दोन शो पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी खास नाटक कंपनीने आयोजित केले होते. मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांनीही आपल्या सहकाऱ्यांबरोबर हा चित्रपट पाहाण्याचा आनंद लुटला.
सांस्कृतिक, नाट्य चळवळीत काम करणाऱ्या नाटक कंपनी चिपळूणने आजवर सामाजिक भान जपलं आहे. कोविड फायटर क्रिकेट लीग, महापुराच्या काळात विनामूल्य गणेशमूर्ती, स्वच्छता अभियान, असे विविध उपक्रम राबवले आहेत. एकदा येऊन तर बघा, हा अभिनेता ओंकार भोजने याचा चित्रपट जिद्द मतिमंद शाळेतील मुलांसाठी व पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी विनामूल्य दाखविण्यात आला होता. आता थांबायचं नाय, हा सिनेमा अतिथी सिनेमागृहात सुरू झाला आहे. या सिनेमाच्या पहिल्याच दिवशी नाटक कंपनी चिपळूणने खास चिपळूण नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी दोन विनामूल्य शो आयोजित केले होते. मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
नाटक कंपनी चिपळूणच्यावतीने अध्यक्ष श्रवण चव्हाण, उपाध्यक्ष योगेश बांडागळे, सदस्य तुषार जाधव, प्रद्युम्न देवधर, अमेय चितळे, सल्लागार विश्वास पाटील, संस्कार लोहार, पारस शिगवण यांनी या दोन्ही शोचे उत्तम नियोजन केले होते. यासाठी अतिथी सिनोमागृहाचे अनिरुध्द करंजकर यांचेही सहकार्य लाभले. शिक्षणाचे महत्त्व सांगणारा आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचे महत्वाचे सांगणारा हा चित्रपट पाहून सफाई कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आणि नाटक कंपनी चिपळूणचे त्यांनी आभार मानले.

