(चिपळूण)
शहरातील इंडिया ट्रेडिंग कंपनीचे संचालक आणि ज्येष्ठ व्यापारी सुधीरशेठ केशव लोवलेकर (वय ६४) यांचे पुण्यात उपचार सुरू असताना ५ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते.
चिपळूण बाजारपेठेतील इंडिया ट्रेडिंग कंपनी ही तब्बल ६० वर्षांहून अधिक जुनी असून, शहराच्या व्यापारी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. या कंपनीची स्थापना कै. आप्पाशेठ लोवलेकर, अण्णा तांबे, वैद्य आदींनी केली होती. कै. आप्पाशेठ लोवलेकर हे जनसंघाचे कार्यकर्ते होते आणि आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला होता. त्यानंतर व्यापारी नेते म्हणून जिल्ह्यात त्यांनी मोठे कार्य केले.
ही परंपरा पुढे नेत सुधीरशेठ लोवलेकर यांनी व्यापारी क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. सामाजिक कार्यातही ते तितक्याच सक्रियतेने सहभागी झाले. “व्यापारी क्षेत्रातील एक कार्यक्षम आणि सामाजिक भान असलेला चेहरा आपण गमावला आहे,” अशा शब्दांत चिपळूणचे ज्येष्ठ व्यापारी व माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब काणे यांनी श्रद्धांजली वाहिली.
सुधीरशेठ यांच्या निधनामुळे व्यापारी व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ते मनमिळाऊ व आपुलकीच्या स्वभावासाठी ओळखले जात होते, अशी भावना व्यापारी संघटना व निकटवर्तीयांनी व्यक्त केली.
त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. यापैकी एक मुलगी विवाहित असून सध्या जर्मनीत वास्तव्यास आहे. तिच्या आगमनानंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे रविवारी (७ सप्टेंबर) अंत्यसंस्कार होणार असल्याचे कुटुंबीयांनी कळविले आहे.

