(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करत दोघा कंत्राटी वाहनचालकांना कामावरून हटवले आहे. या प्रकरणाचा अहवाल आरोग्य उपसंचालकांकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी गुरुवारी दिली.
मंडणगड तालुक्यातील देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वाहन चालक आणि मंडणगड येथील रुग्णवाहिकेचा चालक यांना या दुर्लक्षिततेस जबाबदार धरत कामावरून हटवण्यात आले आहे. तसेच संबंधित ठेकेदाराचा करार रद्द करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असेही डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले.
ही घटना शनिवारी घडली, जेव्हा एका गर्भवती महिलेला मंडणगड ग्रामीण रुग्णालयातून दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याची गरज होती. मात्र, शासकीय रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने खाजगी वाहनातून नेण्यात आले. प्रवासादरम्यान दुर्दैवाने तिचा आणि बाळाचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली.
या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ठोंबरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी सगरे, कामथे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. असीम कुमार आणि डॉ. अभिषेक गावंडे यांची समिती गठित करण्यात आली होती. या चौकशीत आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच जिल्हा वैद्यकीय अधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस चौकशी करून जबाब नोंदवून संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला.

