(मंडणगड/ वार्ताहर)
दुर्गम डोंगराळ भाग, निसरडे उतार आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या पथकाने दोन दिवस अथक मेहनत घेऊन म्हाप्रळ आणि पंचक्रोशीतील वाड्यांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला. मंडणगड तालुक्यातील बोलाडेवाडी ते चिंचाळी धरण या अत्यंत दुर्गम परिसरात ११ के.व्ही. उच्चदाब वाहिनीचे ११ खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल ४८ तासांच्या प्रयत्नांनंतर २१ ऑक्टोबर रोजी रात्री वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.
१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी म्हाप्रळ परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत ११ के.व्ही. उच्चदाब वाहिनीचे तब्बल ११ खांब जमीनदोस्त झाल्याचे निदर्शनास आले. हे खांब बोलाडेवाडी ते चिंचाळी धरण या दुर्गम आणि खडतर भागात कोसळले होते. या परिसरात वाहने पोहोचणे अशक्य असल्याने दुरुस्तीच्या कामात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. धोकादायक वळणे, तीव्र उतार आणि डोंगराळ भूप्रदेश यामुळे नवीन खांब, वीजतारा आणि अन्य साहित्य घटनास्थळी पोहोचवणे हे कर्मचाऱ्यांसमोर मोठे आव्हान होते.
दोन दिवसांच्या मेहनतीनंतर ११ खांब उभारले
वीजग्राहकांना लवकरात लवकर दिलासा देण्याच्या उद्देशाने महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांचे पथक तातडीने दुरुस्तीच्या कामाला लागले. दुर्गम भागात साहित्याची वाहतूक करण्यासाठी कर्मचाऱ्यांना खांद्यावरून ओझे वाहावे लागले. विविध तांत्रिक अडचणींवर मात करत या पथकाने अवघ्या दोन दिवसांत कोसळलेले सर्व ११ खांब बदलले आणि वीजवाहिनी उभारण्याचे काम पूर्ण केले. सलग दोन दिवस केलेल्या अथक प्रयत्नांमुळे २१ ऑक्टोबर रोजी रात्री परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला.
कंत्राटदारांसह ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य
दुर्गम भागातील हे आव्हानात्मक काम यशस्वी करण्यासाठी महावितरणच्या कंत्राटदारांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. M/s AG Industries चे श्री. अलदार आणि श्री. बिजापूरे, ‘साहिल इलेक्ट्रिकल’चे रुपेश सपकाळ तसेच ‘M/s क्रांती इलेक्ट्रिकल्स’चे महेंद्र जगताप यांनी विशेष पुढाकार घेतला. लघुदाब वाहिनीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी श्री. पवार (श्रवण इलेक्ट्रिकल), सुमेद वैद्य, पंकज घाग (यश इलेक्ट्रिकल) आणि श्री. मोडक (श्री इलेक्ट्रिकल) यांनी सहकार्य केले. तसेच ३३ के.व्ही. पालगड वाहिनीच्या कामासाठी श्री. पिंगळे (ऋषिकेश इलेक्ट्रिकल) यांनी मदत केली.
या संपूर्ण मोहिमेत म्हाप्रळ येथील स्थानिक ग्रामस्थांनीही पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. प्रतिकूल परिस्थितीत ग्रामस्थांनी दिलेली साथ दुरुस्तीच्या कामासाठी मोलाची ठरली आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले.
समन्वयातून वीजपुरवठा पूर्ववत
महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यातील समन्वय व सांघिक प्रयत्नांमुळेच हे कठीण काम निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य झाले, असे सांगत मंडणगडचे उपकार्यकारी अभियंता यांनी सर्वांचे आभार मानले. प्रतिकूल परिस्थितीत तत्परतेने काम करून म्हाप्रळ आणि पंचक्रोशीतील वाड्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करणाऱ्या महावितरणच्या पथकाचे परिसरातून कौतुक होत आहे.


