(संगमेश्वर)
तालुक्यातील देवरुख ओझरे खुर्द (गणेशवाडी) येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ३४ हजार रुपयांचे चांदीचे भांडी आणि दोन गॅस टाक्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी सकाळी चोरीचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरीबाबत विजय मनोहर जागुष्टे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. कामानिमित्त बाहेर गेलेल्या काळात त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान वस्तू लंपास केल्या. चोरी झाल्याचे त्यांच्या घरी परतल्यानंतर लक्षात आले. चोरट्यांनी घरातून चांदीचे ताम्हण, तांब्या, पंचपळी, हार, मोदक, जास्वंद फुल, निरंजन, गणेश मूर्ती, बाळकृष्ण मूर्ती, फुलपात्र तसेच दोन गॅस टाक्या असा एकूण ३४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
चोरीची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ३३१ (२), ३३१ (४) व २०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.