(सातारा)
रत्नागिरीपासून थेट महाबळेश्वर किंवा पश्चिम महाराष्ट्रात जाणं हे आता अधिक सोपं, सुरक्षित आणि वेळ वाचवणारं ठरणार आहे. कारण सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याशी थेट जोडणारा भव्य आणि अत्याधुनिक केबल स्टे ब्रिज बांधण्यात येत आहे. या पुलाच्या बांधकामासाठी तब्बल १७५ कोटी रुपयांचा खर्च होणार असून, या वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबर २०२५ पर्यंत तो पूर्ण होणार आहे. हा पूल पूर्णत्वास गेल्यानंतर कोकणातून महाबळेश्वरला जाण्याचे अंतर सुमारे ५० किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी आणि स्थानिक प्रवाशांसाठी ही एक मोठी सोय होणार आहे.
या केबल स्टे ब्रिजची वैशिष्ट्ये
या संपूर्ण प्रकल्पाचं काम टी अँड टी कंपनीकडे देण्यात आलं असून, काम वेगात सुरू आहे. या पुलामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संपर्क अधिक बळकट होणार आहे. केवळ पर्यटकांनाच नव्हे, तर स्थानिक रहिवाशांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. व्यापाऱ्यांसाठी माल वाहतूक जलद होणार आहे आणि पावसाळ्यात अनेक वेळा निर्माण होणाऱ्या अडचणीही या पुलामुळे दूर होतील.
या दोन्ही पुलांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या – विशेषतः राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या – आधीच मिळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामाला कायदेशीर किंवा पर्यावरणविषयक कोणतीही अडचण नाही. हे प्रकल्प फक्त वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार नाहीत, तर पर्यटनासाठीही मोठं आकर्षण ठरणार आहेत. या पुलामुळे महाबळेश्वरच्या पर्यटनाला नवा बूस्ट मिळेल, आणि कोकणातील पर्यटनही अधिक वाढेल, असं तज्ज्ञांचे मत आहे.
महाबळेश्वर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजय देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा अत्यंत तत्परतेने काम करत आहे. कोकणात जाणा-या आणि तिथून परत येणाऱ्या नागरिकांसाठी हे पुल एक नवी लाईफलाईन ठरणार आहेत.