(दापोली / प्रतिनिधी)
महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेला आणि प्रामुख्याने भीमाशंकरच्या घनदाट अरण्यात आढळणारा शेकरू हा प्राणी तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा दापोलीत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात दिसून आला आहे. याबद्दल निसर्गप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दापोली तालुक्यात शेकरूची पहिली नोंद १९९८ मध्ये झाली होती. त्यावेळी कुडावळे येथे प्रसिध्द प्राणी तज्ज्ज्ञ डॉ. उमेश मुंडले यांना या देखण्या प्राण्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर प्रदीर्घ काळ दापोली परिसरात शेकरूचे दर्शन झाले नव्हते. दापोलीतील गिम्हवणे येथील अव्दिक भांबुरे यांना हा शेकरू दिसला. त्यांनी मोबाईलवरच्या कॅमेऱ्यात त्याचे चित्रीकरण केल्याचे वनविभागाचे वनपाल रामदास खोत यांनी सांगितले. दुसऱ्यांदा या शेकरू प्राण्याचे अस्तित्व समोर आल्याने वन्यजीव साखळीच्या दृष्टीने ही एक मोठी सकारात्मक गोष्ट मानली जात आहे.
शेकरू हा प्राणी उंदीर, खारीच्या कुळातील मानला जातो. जगातील सर्वात मोठय्या खारीपैकी एक तो आहे. गडद तांबुस आणि विटकरी रंगाचे मऊ केस, अंगापेक्षा लांब आणि झुबकेदार शेपटी, जी झाडावर संतुलन राखण्यास मदत करते. संकटाची चाहूल लागल्यास हा प्राणी मोठ्याने ओरडून इतर प्राण्यांना सावध करतो. हा प्राणी जमिनीवर फारसा येत नाही, उंच झाडांच्या शेंड्यावरच त्याचे घरटे असते.
तज्ज्ञांच्या मते शेकरूचे दर्शन होणे हे त्या भागातील जंगल आणि पर्यावरणाचा दर्जा चांगला असल्याचे लक्षण आहे. दापोलीतील वनराई, विशेषतः येथील जुन्या आमराई आणि घनदाट झाडी शेकरूसाठी पोषक ठरत आहेत. १९९८ नंतर आता पुन्हा शेकरू दिसणे हे दापोलीच्या जैवविविधतेसाठी अत्यंत आशादायी चित्र आहे.

