( नागपूर )
नागपूर महानगरपालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया आणि बंडखोरी गंभीरपणे घेत भाजपने कडक कारवाई केली आहे. बंडखोर उमेदवारांसोबतच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात छुपा प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजपने 32 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, काही माजी नगरसेवकांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे.
2017 मध्येही अशाच प्रकारच्या कारवाईत भाजपने 65 जणांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला होता. यंदाही अनेक प्रभागांमध्ये भाजप आणि संघ परिवारातील कार्यकर्त्यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत निवडणूक अर्ज दाखल केले.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माघार घेण्याचे आवाहन करूनही काही बंडखोरांनी निर्णय बदलला नाही. यात विनायक डेहनकर, माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण यांच्यासह इतरांचा समावेश आहे. ही बाब पक्ष कार्यकारिणीने अत्यंत गंभीरतेने घेतली असून, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी 32 जणांवर निलंबनाची कारवाई जाहीर केली आहे.
पक्षशिस्त सर्वांसाठी समान असून, ती मोडणाऱ्यांना पक्षात स्थान नाही. तिकीट न मिळाल्याच्या कारणावरून पक्षाविरोधात भूमिका घेणे अयोग्य आहे. त्यामुळेच ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे दयाशंकर तिवारी यांनी स्पष्ट केले.
छुप्या प्रचाराविरोधात कडक इशारा
तिकीट न मिळाल्याने काही माजी नगरसेवकांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात छुपी मोहीम सुरू केल्याची माहिती पक्षाने घेतली आहे. निवडणूक काळात पक्षाचा आदेश अंतिम असतो. जो कोणी अधिकृत उमेदवारासाठी काम करणार नाही किंवा पक्षाच्या विरोधात छुप्या पद्धतीने प्रचार करेल, त्याच्यावर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.

