(पालघर)
शहरातील मुख्य बाजारपेठेत ‘सिनेस्टाईल’ घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी शेजारच्या दुकानातून भिंतीत बोगदा खोदत अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील नाकोडा ज्वेलर्स या प्रतिष्ठित दागिन्यांच्या दुकानात प्रवेश करून तब्बल 3 कोटी 72 लाख 35 हजार 460 रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि 20 लाख रुपये रोख असा एकूण सुमारे 4 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेने पालघर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना शनिवार रात्री घडली असून, नाकोडा ज्वेलर्सचे मालक पीयूष दिनेश जैन यांनी दुकान बंद करून घरी गेल्यानंतर ही चोरी करण्यात आली. चोरट्यांनी प्रथम शेजारील ‘जान्हवी फॅशन’ या कपड्याच्या दुकानाचे शटर फोडले आणि तिथून भिंतीतून बोगदा खोदून थेट ज्वेलर्स दुकानात प्रवेश केला.
त्यानंतर चोरट्यांनी तिजोरी गॅस कटरने कापून त्यात ठेवलेल्या मौल्यवान दागिन्यांवर हात साफ केला. चोरी गेलेल्या ऐवजामध्ये —
९२ सोन्याच्या चैन, 31 नेकलेस, 271 अंगठ्या, 359 कानातील टॉप्स आणि झुमके, 120 रिंग्स, 92 पेंडल, 146 चैन पेंडल, 19 कानचैन, 118 मंगळसूत्र वाट्या, 8 ब्रेसलेट, 12 लटकन, 12 सोन्याचे कॉइन, 40 किलो चांदीचे दागिने आणि 20 लाख रुपये रोख रक्कम असा कोट्यावधींचा माल आहे.
घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली. त्यात 5 ते 6 चोरटे या चोरीत सहभागी असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शॉपिंग कॉम्प्लेक्समधील सुरक्षारक्षकांनी इतर साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे दुकानदारांनी एकत्रित रित्या ठेवलेल्या सुरक्षारक्षक दिपक सिंग आणि नरेश दोघांनी संगनमत करून अन्य साथीदारांच्या मदतीने ज्वेलर्स दुकानात चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पालघर पोलिस ठाण्यात दिपक सिंग, नरेश आणि अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305(1), 331(3), 331(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

