( रत्नागिरी )
बँकेने थकबाकीपोटी जप्त केलेल्या मिळकतीत जबरदस्तीने प्रवेश करत कुलूप तोडून नुकसान केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शहरालगत नाचणे परिसरात घडली.दानिश जमीर पटेल (वय ३९, रा. राजनगर, चर्मालय, माजगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असून, त्यांच्या विरोधात अख्तर फकीर महंमद काझी (वय ५९, रा. पावस) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिश पटेल यांच्या नावावर नाचणे येथील दोन मिळकती बँकेने २२ एप्रिल रोजी थकबाकीच्या पार्श्वभूमीवर जप्त केल्या होत्या. तथापि, बँकेच्या ताब्यात असलेल्या या मिळकतींमध्ये दानिश पटेल यांनी मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप तोडून बेकायदेशीर प्रवेश केला. या कृतीत नुकसान करून त्यांनी जिल्हाधिकारी व मंडल अधिकाऱ्यांच्या आदेशांचे सरळसरळ उल्लंघन केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच, बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संबंधित कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.