(रायगड)
पनवेल तालुक्यातील कोळखे, पेठ येथील ‘बसेरा अपार्टमेंट’मध्ये २४ फेब्रुवारी २०१९ रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, गणपत लक्ष्मण पवार याने पत्नीची निर्दय हत्या केली होती. या प्रकरणाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, पनवेल जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश-१ यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावत त्याच्या अल्पवयीन मुलाला पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
घटनेचा तपशील:
२४ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बसेरा अपार्टमेंटच्या ‘ए विंग’, रुम नंबर १ मध्ये बबिता गणपत पवार ही महिला रक्ताच्या थारोळ्यात, बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. गावचे पोलिस पाटील पांडुरंग कोंडीराम जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिच्या पोटात धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. त्यानंतर पती गणपत पवार याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिने विश्वासघात केल्याच्या आरोपावरून तिची हत्या केल्याची कबुली दिली. घटनेनंतर त्याने विषारी औषध प्राशन केले होते. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, तर बबिता पवार यांना पनवेल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
लहान मुलाची साक्ष ठरली निर्णायक
या खटल्यातील महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी आणि मयत यांचा अल्पवयीन मुलगा हा घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. न्यायालयाने त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवत आरोपीला दोषी ठरवले. निकालात न्यायाधीशांनी नमूद केले की, “लहान वय असूनही सत्य बोलण्याचे धैर्य दाखवलेल्या या मुलाच्या साक्षीमुळे आरोपीवर दोष निश्चित करता आला.” त्याचबरोबर मुलाच्या भविष्यासाठी पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
न्यायासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा
हा निकाल घटनेतील पीडित व त्याच्या कुटुंबीयांसाठी न्यायाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. विशेषतः अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये अल्पवयीन साक्षीदारांचे महत्त्व किती मोठे असते, यावर या निकालाने पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे.