(मुंबई)
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे यंदा संपूर्ण राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. परंतु, शासनाने अधिकृत संकेतस्थळ अद्याप जाहीर केले नसताना ‘11thadmissionorg.com’ नावाने एक बनावट संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून, या वेबसाईटवर शासनाचा लोगो, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे छायाचित्र आणि इतर अधिकृत माहितीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याआधी अकरावी प्रवेश प्रक्रिया फक्त पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या महानगरपालिका क्षेत्रांपुरती मर्यादित होती. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ही प्रक्रिया राज्यभरात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा दहावी उत्तीर्ण होणारे सुमारे १६ लाख विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अकरावीचे अर्ज भरणार आहे. याचाच गैरफायदा घेत फेक वेबसाईट तयार करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, शहरातील टॉप कॉलेज कोणते, अशा प्रकारची दिशाभूल करणारी माहितीही त्यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. वेबसाईटवर “ही अधिकृत वेबसाईट नाही” असे सूचित केले असले, तरी त्यावरील मांडणी, फोटो आणि लोगोमुळे ती अधिकृत असल्याचा भास निर्माण होत आहे.
या साईटवर आता विभाग या प्रकारावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाकडून अधिकृत संकेतस्थळ लवकरच जाहीर करण्यात येईल, असे संकेत मिळाले असून, तोपर्यंत विद्यार्थी आणि पालकांनी अशा बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.