(राजापूर / तुषार पाचलकर)
महसूल व वन विभागाच्या पुढाकारातून आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाच्या टप्पा क्रमांक १ अंतर्गत राजापूर तालुक्यातील नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १० एप्रिल २०२६ रोजी ग्रामपंचायत सभागृह, पाचल येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणार आहे.
तहसील कार्यालय राजापूर यांच्या वतीने आयोजित या शिबिरात विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
शिबिरामध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’, आधार नोंदणी व दुरुस्ती, अंगणवाडी सेवा, पीएम किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, लक्ष्मी मुकी योजना, तसेच महसूल विभागाशी संबंधित प्रकरणे यांचा समावेश असेल. याशिवाय तक्रार निवारण व मार्गदर्शन, तसेच रेशनकार्ड व अंत्योदय योजनेबाबतही सुविधा उपलब्ध राहणार आहेत. तरी परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

