(संगमेश्वर)
तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प तुकाराम महाराज काजवे यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना लहानपणापासूनच पखवाज वादनाची व गायनाची आवड होती. परिसरात कोठे हरिपाठ, भजन असेल तेथे साथसंगत करण्यासाठी जात असत.वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी गुरुवर्य ह.भ.प गोविंद महाराज डाफळे यांच्याकडे दीक्षा घेतली. अल्पावधीतच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचे कीर्तन प्रवचन होऊ लागले.
२०१८ साली संगमेश्वर तालुक्यातील संपूर्ण वारकरी संप्रदायाला एकत्र आणण्याचे मोलाचे काम त्यांनी सुरू केले त्यामुळेच २०२३साली संगमेश्वर तालुक्याचा भव्य वारकरी मेळावा त्यांच्या मोलाच्या सहकार्यातून संपन्न झाला. त्यांनी कुचांबे परिसरातील अनेक अशिक्षित महिलांनाही हरिपाठ,काकड आरती, भजन यांचा सराव करून घेतला. सध्या नावारूपास आलेल्या शिववैभव ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची पायाभरणी त्यांनीच केली.ते पतपेढीचे संचालक होते. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी जनसमुदायाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या अंत्ययात्रेला संपूर्ण जिल्हाभरातून हजारो वारकरी उपस्थित होते.
त्यांचा उत्तर कार्यविधी शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या कुचांबे येथील निवासस्थानी येथे होणार आहे. दिनांक ३० नोव्हेंबर रोजी तेराव्याचा विधी होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सायं. सात ते आठ हरिपाठ व त्यानंतर कुरधुंडा येथील किर्तनकार महंत ह.भ.प.अनंत महाराज लिंगायत यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.