(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गेल्या दोन-तीन दिवसांपासून अधूनमधून दमदार सरी कोसळत असताना गुरुवारी सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात संततधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून, शेतीच्या कामांनाही अपेक्षित गती मिळू लागली आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढत असल्याने उर्वरित पेरण्या वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.
गुरुवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने दुपारपर्यंत चांगलाच जोर धरला होता. त्यानंतर सायंकाळी काही काळ विश्रांती मिळाली असली, तरी रात्री पुन्हा आभाळ दाटून आल्याने जोरदार सरींची शक्यता निर्माण झाली होती. पावसाचा वेग अद्याप समाधानकारक नसला, तरी पडणाऱ्या सरी शेतीसाठी पोषक ठरत असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २९ जूनपर्यंत जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, जून महिनाअखेरपर्यंत अतिवृष्टीची चिन्हे दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदाही जूनमधील सरासरी पावसाची नोंद अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या नोंदीनुसार, गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २८.३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतीला आवश्यक ओलावा मिळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच अनेक शेतकऱ्यांनी धाडसाने पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र, पावसाने उशीर केल्याने उगवलेली रोपे करपू नयेत म्हणून काही ठिकाणी टँकरद्वारे पाण्याची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. आता संततधार पावसामुळे ही चिंता दूर झाली असून, जिल्ह्यात सुमारे ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले यांनी दिली. उर्वरित ३० टक्के पेरण्याही आगामी पावसाच्या जोरावर वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

