(रत्नागिरी)
कोकण रेल्वेच्या सुरक्षाव्यवस्थेचा कस पाहणारा एक महत्वपूर्ण मॉक ड्रिल आज यशस्वीरीत्या पार पडला. या मॉक ड्रिल अंतर्गत, एअर स्ट्राईकच्या संभाव्य हल्ल्याची परिस्थिती उभी करून रेल्वे प्रशासन, सुरक्षा यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन प्रतिसादाची तयारी तपासली.
हल्ल्यानंतर काही क्षणांतच कोकण रेल्वेची यंत्रणा सतर्क झाली व तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रेल्वेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होऊन परिस्थितीचे बारकाईने मूल्यांकन करत बचाव कार्य सुरू केले. या काल्पनिक हल्ल्यात जखमी झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना व नागरिकांना विशेष उभारण्यात आलेल्या आपत्कालीन तंबूमध्ये हलवून तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर दाखल झालेल्या रुग्णवाहिकेमार्फत जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
या मॉक ड्रिलची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाची आरोग्य, अग्निशामक, पोलीस व इतर संबंधित विभागांची यंत्रणा देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्य करत एक आदर्श आपत्कालीन प्रतिसादाचे दर्शन घडवले.