(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गणपतीपुळे व भगवतीनगर परिसरात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे बुधवारी 7 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले. या परिसरात बुधवारी पहाटे तीन वाजल्यापासून विजांच्या कडकडांसह मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. तसेच वादळी वाऱ्याच्या तडाख्याने अनेक ठिकाणी पडझड झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामध्ये गणपतीपुळे येथे गणपती मंदिर परिसरात भाविकांच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या मंडपावरील हिरव्या कापडाचे छप्पर उडाले.
गणपतीपुळे मंदिर परिसर व व सुलभ शौचालय परिसरात असलेल्या स्थानिक व्यावसायिकांच्या दुकान स्टॉल वरील छप्पर उडाल्याने ऐन गर्दीच्या उन्हाळी पर्यटन हंगामात स्थानिक व्यावसयिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. तसेच मालगुंड परिसरात वादळीवाऱ्याच्या तडाख्यामुळे मालगुंड बाजारपेठेतील जीवन शिक्षण शाळा नंबर १ नजीक असलेल्या मालगुंड भंडारवाडा रस्त्यावर आंब्याचे मोठे झाड कोसळून पडल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. तर भगवती नगर परिसरात महावितरणचे चार विद्युत पोल कोसळून पडल्याने या परिसरात दिवसभर विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच मालगुंड गणपतीपुळे वरवडे भगवतीनगर निवेंडी परिसरात अवकाळी पावसाचा वादळ वाऱ्याच्या तडाख्यामुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ, तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतीकडून देण्यात आली.