(रत्नागिरी)
जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं. १ (ता. जि. रत्नागिरी) येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली असून, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश पवार, उपाध्यक्षपदी वासुदेवजी वाघे आणि कोषाध्यक्षपदी प्रमोद पावसकर यांची निवड करण्यात आली. यावेळी विश्वासागर नार्वेकर, अमरनाथ नार्वेकर, सचिन चव्हाण, उपेंद्र हरचकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
निवड प्रक्रियेवेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेचा विकास साधण्याचे उद्दिष्ट ठेवून शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
“शाळा विविध क्षेत्रांत प्रगतीपथावर यावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,” असे उपाध्यक्ष वासुदेवजी वाघे यांनी सांगितले. तर “सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्रित घेऊन शाळेच्या उन्नतीसाठी काम केले जाईल,” असे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी स्पष्ट केले.
या नव्या संघटनेला शाळेच्या मुख्याध्यापिका व केंद्रप्रमुख भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर तसेच विशेष शिक्षिका तृप्ती शिरगावकर यांनी शुभेच्छा दिल्या. माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

