(रत्नागिरी)
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून राबविण्यात येणारी सर्व कामे दर्जेदार आणि ठरलेल्या वेळेत पूर्ण झालीच पाहिजेत. दिलेली डेडलाईन पाळली नाही, किंवा कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रार आली, तर संबंधित विभागप्रमुखांची चौकशी केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिला.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2025-26 संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी विभागनिहाय सादरीकरण करून माहिती दिली.
जिल्हाधिकारी जिंदल यांनी विभागनिहाय आढावा घेताना झालेली कामे, प्राप्त मागण्या आणि दायित्व याबाबत सविस्तर माहिती घेतली. दायित्वाबाबतची मागणी ५ मार्चपर्यंत सादर करावी, अन्यथा चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासकीय मान्यता देताना घालण्यात आलेल्या अटी व शर्तींचे काटेकोर पालन झाले पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
“हा करदात्यांचा पैसा आहे. तो योग्य, दर्जेदार आणि उपयुक्त कामांसाठीच वापरला गेला पाहिजे,” असे सांगत जिल्हाधिकारी यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत बाह्य संस्थेमार्फत तपासणी केली जाईल, असेही स्पष्ट केले.
१५ मार्चपर्यंत मंजूर निधी खर्च व्हावा आणि ज्या कामासाठी निधी देण्यात आला आहे, ते कामही वेळेत पूर्ण झाले पाहिजे. सर्व विभाग १०० टक्के निधी खर्च करतील, असा मला विश्वास आहे, असे सांगत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी उपस्थितांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या.

