(गुहागर)
गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २३ वा वर्धापन दिन नुकताच वरवेली (ता. गुहागर) येथील संस्थेच्या कार्यालयात विविध उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दीपप्रज्वलन आणि प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला युनायटेड हायस्कूल चिपळूणचे माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे, माजी जिल्हा समाजकल्याण अधिकारी जे. पी. जाधव, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संदीप आंब्रे, वरवेली सरपंच नारायण आगरे, संस्थेचे सल्लागार अरुण मुळे, विनायक ओक, प्रकाश बापट, किरण शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक हर्षल रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि दिव्यांग बांधवांच्या अडचणी विषद केल्या. यावेळी विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
-
दिव्यांग मित्र पुरस्कार संदीप अनंत आंब्रे (चिपळूण) यांना
-
दिव्यांग साथी पुरस्कार पत्रकार गणेश किर्वे (वरवेली) यांना
-
स्वयंसिद्ध पुरस्कार क्रिशा कल्पेश देवळे (अडुर, गुहागर) यांना देण्यात आला.
पुरस्कारांचे स्वरूप सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे होते.
निधी संकलन उपक्रमांत उल्लेखनीय योगदान दिलेल्या सान्वी खातू (श्री देव गोपाळ कृष्ण विद्यालय) व साकेत गुरव (अन्नपूर्णा वैद्य विद्यालय) या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच “नासा” व “इस्रो”मध्ये निवड झालेल्या विविध विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रथमच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सर्वसामान्य वधू-वर सूचक मेळाव्यास भरघोस प्रतिसाद मिळाला. महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमही उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंद कानडे होते. त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना असे नमूद केले की, “दिव्यांग संस्थेने इतरांना पुरस्कार देणे ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर कांबळे, प्रकाश अनगुडे व रूपेश सौंदेकर यांनी केले. आभार प्रदर्शन भरत कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरचिटणीस सुनील रांजणे, अमित जोशी, प्रवीण मोहिते, सुनील मुकनाक, सानिका रांजणे, वेदिका आंबेकर, संतोष घुमे व संतोष कदम यांनी विशेष मेहनत घेतली.