(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी–हातखंबा मार्गावरील खेडशी येथील महालक्ष्मी मंदिराजवळील महामार्ग पुन्हा एकदा अपघातासाठी कारणीभूत ठरला आहे. स्पष्ट दिशादर्शक व सूचना फलकांचा अभाव, अपूर्ण कामे आणि ठेकेदाराची ढिसाळ कार्यपद्धती यामुळे मोटार व दुचाकीचा भीषण अपघात होऊन एका दाम्पत्याला गंभीर दुखापत झाली आहे.
शशिकांत गजानन सनगरे (वय ३७, रा. हातखंबा) व जान्हवी शशिकांत सनगरे (वय ३२) अशी जखमींची नावे असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळील दिशादर्शक फलकाजवळ हा अपघात घडला. शशिकांत सनगरे हे पत्नी जान्हवी यांच्यासह दुचाकीवरून रत्नागिरीकडे येत असताना, मागून येणाऱ्या मोटारीने जोरदार धडक दिली. महामार्गावर योग्य दिशादर्शक (डायव्हर्शन) नसल्याने मोटार चालकाला पुढील रस्ता कळू शकला नाही, परिणामी हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
अपघाताची तीव्रता इतकी होती की, मोटारीचे बॉनेट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून दुचाकी अक्षरशः चुरगळली गेली. अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू करून वाहतूक सुरळीत केली. मात्र या मार्गाचे काम करणारी रवी इन्फ्रा बिल्ड ही ठेकेदार कंपनी वारंवार अशा निष्काळजीपणामुळे चर्चेत आहे. अपूर्ण कामे, दिशादर्शकांचा अभाव, अर्धवट खोदलेले रस्ते आणि कोणतीही सूचना न देता वाहतूक सुरू ठेवणे, हा प्रकार केवळ निष्काळजीपणाच नव्हे तर थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी नेमके करतायत तरी काय? वारंवार लहान–मोठे अपघात घडत असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खेडशी, हातखंबा आणि आजूबाजूच्या परिसरात याआधीही अनेक अपघात घडले असून, तरीही ठेकेदारावर कारवाई किंवा कामाच्या दर्जावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
अपघात झाल्यावर चौकशी, पण अपघात टाळण्यासाठी उपाय कधी? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

