( मुंबई )
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जाती (एससी) आरक्षणात उपवर्गीकरण लागू करण्याचे महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या एका निकालात अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरणास मान्यता देण्यात आली असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत महाराष्ट्रात याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. एका मुलाखतीत फडणवीस यांनी मराठा आणि इतर जातींच्या आरक्षणाच्या आंदोलनांवर भाष्य करताना हे संकेत दिले. ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणात क्रिमीलेअर आणि नॉन-क्रिमीलेअर अशी व्यवस्था आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम ओबीसी व्यक्तीला आरक्षणाचा लाभ मिळत नाही, तर नॉन-क्रिमीलेअर वर्गाला तो मिळतो. सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातींसाठीही क्रिमीलेअरचा फॉर्म्यूला लागू करण्याबाबत आणि उपवर्गीकरणाबाबत मार्गदर्शन केले आहे. काही जातींना आरक्षणाचा पुरेसा लाभ मिळत नसल्याने उपवर्गीकरणाची गरज आहे. मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही अनेक वर्षांपासून राजकारणात आहोत. आम्हाला आमच्या मर्यादा माहिती आहेत. त्यामुळे आमच्यात वाद होत नाहीत. एखादया विषयावर मतमतांतरे असू शकतात. पण त्यासाठी आम्ही एकत्र बसतो आणि मार्ग काढतो. २०२९ च्या निवडणुकादेखील आम्ही एकत्रच लढू, असे फडणवीस म्हणाले.
समितीचे काम अंतिम टप्प्यात; वाद निर्माण होण्याची शक्यता
फडणवीस यांनी सांगितले की, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उपवर्गीकरणासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सध्या अंतिम टप्प्यातील काम करत असून, पुढील दोन-तीन महिन्यांत उपवर्गीकरण लागू होईल. महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी १३ टक्के आरक्षण आहे. उपवर्गीकरण लागू झाल्यास या प्रवर्गातील विविध जातींना त्यांचा निश्चित कोटा मिळेल, ज्यामुळे आरक्षणाचा लाभ अधिक समानतेने वाटला जाईल. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या या निकालाला देशभरातील काही राज्यांमध्ये विरोध झाला आहे. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
५ वर्षे मी महाराष्ट्रातच !
“माझ्या पक्षाची कार्यपद्धती, पक्षातील आतापर्यंतचे ज्ञान पाहता मी असे सांगू शकतो की, या पाच वर्षांसाठी मी महाराष्ट्रातच असेन. पाच वर्षांनंतर पक्ष काय तो निर्णय घेईल, असे म्हणत भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर नेमणूक होण्याबाबत उठलेल्या वावड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पूर्णविराम दिला. फडणवीस यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षेबद्दल विचारले असता ते म्हणाले, “मी भाजपात काम करतो. तुम्हाला माहिती आहे की या पक्षात, कोणी कुठे राहावे, हे एक व्यक्ती ठरवत नाही.”
भाजपा-संघाचे निर्णय वेगळे
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या पत्रकार परिषदेबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, “पाहा, नावे तयार करणे हे बातम्यांसाठी आहे. आम्ही इतकी नावे ऐकली आहेत आणि त्यापैकी काही इतकी असामान्य होती की मीडिया त्यांचा वापर करू शकेल यावर आम्हाला विश्वासच बसत नव्हता. मला वाटते की भाजपमध्ये एक व्यवस्था आहे आणि आदरणीय सरसंघचालकांनी दिलेल्या उत्तराचा अर्थ असा आहे की आम्ही हा निर्णय घेत नाही; भाजप घेते. आमची निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगळी आहे, भाजपची वेगळी आहे.

