(नालासोपारा / प्रमोद बिर्जे)
संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वच्छतेचा आणि सामाजिक कार्याचा वसा हाती घेत पुण्यातील “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाचे ब्रॅन्ड ॲंबेसिडर, श्री. यशवंत कन्हेरे हे वयाच्या ६९व्या वर्षी “स्वच्छ भारत, समर्थ भारत” हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांच्या भ्रमंतीला निघाले.
गाडगे महाराजांच्या जयंतीदिनी २३ फेब्रुवारीला आपल्या या अनोख्या प्रवासाचा संकल्प करुन दुसऱ्या दिवशी निगडी (पूणे) भक्ती – शक्ती येथील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचा प्रवास सुरू झाला. पुणे – रायगड – नवी मुंबई – मुंबई – पालघर – नाशिक असा सुरु झालेला प्रवास, महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांना भेटी देत, ६३व्या दिवशी, ४५०० कि.मी अंतर कापत ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरात दाखल झाले.
प्रत्येक जिल्ह्यात जात असताना त्यांनी मध्ये शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये येथे थांबून, सर्वांना स्वच्छतेबाबत प्रबोधन केले. प्लास्टिकचा वापर टाळा, प्रदुषणावर नियंत्रण ठेवा, आपला परीसर स्वच्छ ठेवा, आरोग्याची काळजी घ्या, अशा अनेक विषयांवर त्यांनी भेटणाऱ्यांशी संवाद साधला. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कारही झाला.
शेवटी ६३व्या दिवशी म्हणजेच रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी संगमेश्वर कसबा येथे येऊन स्वराज्याचे धाकले धनी, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचे चरण वंदून आपल्या या अनोख्या अभियानाची (प्रवासाची) सांगता केली. तद्नंतर पुरातन महादेव मंदीर फेसबुक ग्रुप शृंगारपूरच्या वतीने, ग्रुपचे ॲडमिन श्री मणेष म्हस्के यांच्या नियोजनाने त्यांचे बंधू श्री. सुखदेवसर म्हस्के यांच्या चिपळूण – सावर्डे येथील निवासस्थानी श्री. यशवंत कन्हेरे यांची चहापान, जेवण आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच श्री. सुखदेव सरांनी त्यांची सह्याद्री शिक्षण संस्थेतील आपल्या सहकाऱ्यांशी भेट घडवून आणली व त्या ठिकाणी त्यांचा छोटासा सत्कारही करण्यात आला.
शेवटी सोमवारी सकाळी त्यांच्या या वयातील भन्नाट सामाजिक कार्याची प्रशंसा करीत आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत ग्रुपच्या वतीने निरोप देण्यात आला.