( साखरपा / भरत माने )
आज सकाळी साखरपा (जाधववाडी) येथे महावितरणच्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून हृदया शांताराम मोरे (वय ७०) या वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचा नातू ओम प्रकाश मोरे गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना महावितरणच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सकाळच्या सुमारास हृदया मोरे घराजवळ असताना तिथे तुटून पडलेली महावितरणची विद्युत लाईन त्यांच्या संपर्कात आली. शॉक लागल्याने त्या जागीच कोसळल्या. यावेळी त्यांचा नातू ओम मोरे आजीला वाचविण्यास धावला असता, त्यालाही शॉक लागून गंभीर इजा झाली.
त्यानंतर ओमचे वडील प्रकाश मोरे व नातेवाईक गणेश मोरे यांनी दोघांना तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी हृदया मोरे यांना मृत घोषित केले, तर ओम मोरेला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले. या घटनेनंतर ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्रात धाव घेत महावितरणच्या निष्काळजी कारभाराचा तीव्र निषेध केला. अनेकांनी घटनास्थळी उपस्थित झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. या अपघाताला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, मृत महिलेच्या कुटुंबाला शासकीय नुकसान भरपाई मिळावी, तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
या घटनेची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी तात्काळ तहसीलदार, महावितरण अभियंता व पोलीस प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले. मृत महिलेच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी व जखमी ओम मोरेच्या उपचारासाठी तत्काळ मदत करण्यात यावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाला सजग होण्यास भाग पाडले आहे.

