(रत्नागिरी)
जयगड येथील डेक्कन ओडीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गेस्ट हाऊसच्या खोलीत किचन ट्रॉलीने महिलेच्या डोक्यात घाव घालून खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मारुती राजाराम मोहिते (वय ५५, रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे.
ही धक्कादायक घटना १४ डिसेंबर २०२० रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. आरोपी मोहिते आणि मृत महिला गेस्ट हाऊसच्या खोलीत असताना महिलेच्या पतीचा फोन आल्याने मोहिते याने संतापून खोलीतील किचन ट्रॉलीने महिलेवर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा कंपनीच्या कामगाराला घटनास्थळी आढळून आल्यानंतर तिला तातडीने जयगड उर्जा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुढे रत्नागिरीतील निर्मल हॉस्पिटल व जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच १६ डिसेंबरला तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात सुरुवातीला भादवी कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, महिलेच्या मृत्यूनंतर गुन्हा भादवी कलम ३०२ मध्ये रुपांतरित करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या खटल्याचा निकाल सोमवारी (ता. २८) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात लागला. सरकारी पक्षातर्फे अँड. पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहताना १९ साक्षीदार तपासले. यामध्ये सरकारी अधिकारी, निर्मल हॉस्पिटलचे डॉ. चौधरी व जिल्हा रुग्णालयाचे डॉ. कुंभरे यांचाही समावेश होता.
न्यायालयाने आरोपी मारुती मोहिते याला भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची, तर कलम ३४३ अंतर्गत १ वर्षे साधी कैद व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून निवृत्त पोलिस उपनिरीक्षक अनंत जाधव, पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील आणि पोलिस हवालदार वंदना लाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.