(कोलंबो )
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर टीम इंडियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या टी-२० विश्वचषक सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी दणदणीत पराभव करत सुपर-८ फेरीत थाटात प्रवेश केला.
या विजयात इशान किशनची स्फोटक फलंदाजी आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेली भेदक मारा निर्णायक ठरली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या १८ षटकांत ११४ धावांत गारद झाला. शानदार कामगिरीसाठी इशान किशनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयामुळे भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला, तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर घसरला.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल करण्यात आले होते. अभिषेक शर्माच्या पुनरागमनामुळं संजू सॅमसनला वगळण्यात आलं आहे, तर कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवरील फिरकीला अनुकूल खेळपट्टीमुळं अर्शदीप सिंगच्या जागी कुलदीप यादवचा संघात समावेश करण्यात आला.
इशान किशनचा तुफानी खेळ
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यामुळे भारताची सुरुवात काहीशी अडखळली. पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. मात्र त्यानंतर इशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर अक्षरशः हल्ला चढवला. इशानने अवघ्या ४० चेंडूंमध्ये ७७ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि ३ षटकार ठोकत पॉवरप्लेमध्येच पाकिस्तानचा खेळ मोडून काढला. कर्णधार सूर्यकुमार यादवने ३२ धावांची संयमी साथ दिली, तर शेवटच्या षटकांत शिवम दुबे (२७) आणि रिंकू सिंह यांनी फटकेबाजी करत भारताला २० षटकांत १७५/६ अशी भक्कम धावसंख्या उभी करून दिली. त्यामुळे पाकिस्तानसमोर १७६ धावांचे आव्हान होते.
गोलंदाजांचा भेदक मारा; पाकिस्तानची दाणादाण
१७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात *हार्दिक पांड्याने साहिबजादा फरहानला शून्यावर बाद करत भारताला पहिला झटका दिला. त्यानंतर **जसप्रीत बुमराह*ने आपल्या वेग आणि अचूकतेने सईम अयुब व कर्णधार सलमान आघा यांना तंबूत धाडले. दुसऱ्याच षटकात पाकिस्तानची अवस्था ३ बाद १३ अशी झाली.
वेगवान गोलंदाजांनंतर फिरकीपटू अक्षर पटेलने सामन्याचा पूर्ण ताबा घेतला. त्याने सेट झालेल्या उस्मान खान (४४) आणि दिग्गज बाबर आझम (५) यांना बाद करत पाकिस्तानच्या उरल्यासुरल्या आशाही संपवल्या. यानंतर वरुण चक्रवर्तीने आपल्या मिस्ट्री स्पिनचा प्रभाव दाखवत सलग दोन चेंडूंमध्ये दोन बळी घेत पाकिस्तानला अक्षरशः शरणागती पत्करायला लावली. कुलदीप यादव आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानचा डाव १८ षटकांत ११४ धावांत संपुष्टात आला.
टी-२० विश्वचषकात भारताचे वर्चस्व कायम
या विजयामुळे भारताचा नेट रनरेट मोठ्या प्रमाणात सुधारला. भारताने टी-२० विश्वचषकातील सलग तिसरा सामना जिंकत ६ गुणांसह सुपर-८ फेरीत दिमाखदार प्रवेश केला आहे. टी-२० विश्वचषकात भारत–पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले गेले असून त्यापैकी तब्बल ८ वेळा भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. पाकिस्तानला केवळ एकदाच भारतावर मात करता आली आहे.
इशान किशनने रचला नवा इतिहास
इशानने अवघ्या २७ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत भारत–पाक टी-२० सामन्यांतील तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवले. त्याने युवराज सिंगचा २९ चेंडूंचा विक्रम मोडला. पॉवरप्लेमध्ये ४२ धावा कुटत त्याने शुभमन गिलचा ३५ धावांचा विक्रमही मागे टाकला. पाकिस्तानविरुद्ध टी-२० सामन्यात दुसरे सर्वात जलद अर्धशतक करणारा भारतीय फलंदाज ठरला. गौतम गंभीरचा ७५ धावांचा विक्रम मोडत ७७ धावांच्या खेळीसह भारत–पाक टी-२० इतिहासातील चौथी सर्वात मोठी खेळी नोंदवली. तसेच पाकिस्तानविरुद्ध टी-२० सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला.

