तामिळनाडूमधील एका १६ वर्षीय तरुणाच्या बाबतीत अशी दुर्मीळ वैद्यकीय घटना समोर आली आहे. त्याच्या डाव्या डोळ्याच्या वर, पापणी आणि भुवईच्या मधल्या भागात दोन टोकदार, पांढरे दातासारखे भाग दिसत होते. वैद्यकीय तपासणीत ते पूर्ण विकसित दात असल्याचे स्पष्ट झाले. या असामान्य प्रकरणाची नोंद अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी (AAO) मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालात करण्यात आली आहे.
‘न्यूयॉर्क पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, तरुणाला सुरुवातीला डाव्या डोळ्याच्या वरच्या भागात सूज जाणवली होती. मात्र, विशेष वेदना होत नसल्याने त्याने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. काही काळानंतर त्या ठिकाणी छोटी गाठ असल्यासारखे वाटू लागले. पुढे पापणी आणि भुवईच्या मधील त्वचेतून दोन कडक, पांढरे आणि टोकदार भाग बाहेर येताना दिसले. त्यानंतर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली.
डॉक्टरांनी विविध वैद्यकीय तपासण्या केल्या. सुरुवातीला हा प्रकार दुर्मीळ ‘टेराटोमा ट्यूमर’ असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. हाडे आणि दातांच्या पेशींशी संबंधित असलेल्या या प्रकाराबाबत तपास करण्यात आला. मात्र, कॉम्प्युटेड टोमोग्राफी (CT) स्कॅनमध्ये डोळ्याच्या खोबणीच्या वरच्या भागात पूर्ण विकसित कॅनाइन टूथ म्हणजेच टोकदार दात असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय भाषेत या भागाला ‘सुपीरियर ऑर्बिट’ असे म्हणतात.
तोंडात दात उगवण्याच्या नेहमीच्या जागेऐवजी शरीराच्या दुसऱ्या भागात दात विकसित होण्याच्या स्थितीला ‘एक्टोपिक टूथ इरप्शन’ (Ectopic Tooth Eruption) असे म्हटले जाते. ‘NCBI’च्या अहवालानुसार, अशा प्रकारे असामान्य ठिकाणी दात उगवण्याच्या घटना यापूर्वीही नोंदवण्यात आल्या आहेत. नाकाची पोकळी, नाकपुड्यांच्या आतील भाग, डोळ्यांच्या खालचा परिसर आणि गालाच्या हाडांच्या आतील भागात दात आढळल्याची उदाहरणे आहेत. मात्र, डोळ्याच्या वरच्या खोबणीत दात आढळल्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याचे अभ्यासाच्या सह-लेखिका डॉ. मेघना तन्वर यांनी सांगितले. “डोळ्याच्या खोबणीच्या वरच्या भागात (सुपीरियर ऑर्बिट) आढळलेला हा अशा प्रकारचा पहिला आणि एकमेव ‘एक्टोपिक टूथ’ आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरुणाच्या चेहऱ्याला यापूर्वी कोणतीही दुखापत झाली नव्हती किंवा त्याला कोणताही अनुवांशिक विकार असल्याचे आढळले नव्हते. तरीही डोळ्याच्या वरच्या भागात दात कसा विकसित झाला, याचा शोध संशोधक घेत आहेत. गर्भात असताना चेहऱ्याच्या पेशींच्या विकासात किंवा संयोजनेत बिघाड झाल्यास किंवा दुखापत/गाठीमुळे असे घडू शकते, परंतु या प्रकरणात नेमके कारण स्पष्ट झाले नाही. यापूर्वी काही प्रकरणांमध्ये दुखापतीनंतर नाकाच्या पोकळीत दात उगवल्याचे आढळले होते; मात्र डोळ्याच्या खोबणीत दात विकसित होणे ही अत्यंत दुर्मीळ घटना मानली जात आहे.
डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून डोळ्याच्या वरच्या भागात आलेले दात सुरक्षितपणे काढून टाकले. त्यानंतर तरुणाच्या डोळ्यावरील सूज कमी झाली असून, त्याच्या डोळ्याला कोणताही धोका नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सीटी स्कॅनमध्ये कवटीच्या इतर कोणत्याही भागात अतिरिक्त दात आढळले नव्हते. त्यामुळे या असामान्य ठिकाणी विकसित झालेल्या दातांव्यतिरिक्त इतरत्र असे दात असल्याची शक्यता तपासणीत दिसून आली नाही.


