(विल्ये / अमित कांबळे)
पालि भाषा आणि धम्मलिपीचे अभ्यासक प्रा. दिलीप वामनराव वासनिक यांना राज्यस्तरीय ‘शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लेखन अन मी साहित्य कला प्रतिष्ठान आणि पाटील फिल्म प्रॉडक्शन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा २०२६ मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी डोंबिवली पूर्व येथील वक्रतुंड सभागृह, गणेश मंदिर संस्थान येथे संगीतमय वातावरणात हा सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.
प्रा. वासनिक यांनी माध्यमिक विद्यालय, करबुडे लाजुळ येथे ३५ वर्षे शिक्षक म्हणून सेवा बजावली. २०२१ मध्ये ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवाकाळात त्यांनी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केली. शाळेचा विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी देणगीदारांशी संपर्क साधून शालेय गणवेश तसेच शाळेसाठी आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या.
‘वाया जाणारे पाण्याचे व्यवस्थापन’ हा प्रकल्प सादर केल्याबद्दल त्यांना विज्ञान प्रसार, नोएडा यांच्यामार्फत प्रदान करण्यात येणारा ‘सायंटिस्ट मेघनाद साहा इन्स्पिरेशन ऑनर अवॉर्ड २०१८’ मिळाला. शैक्षणिक कार्यासोबतच धम्माचा आणि आदर्श महापुरुषांच्या विचारांचा समाजात प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विहारांमध्ये जाऊन मार्गदर्शन केले. कोरोना काळात शाळा बंद असतानाही त्यांनी विहारांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वर्ग घेतले.
शाळा तंबाखूमुक्त ठेवण्याबरोबरच गणपती आणि देवी उत्सवाच्या काळात विसर्जनावेळी निर्माल्य नदीत टाकण्याऐवजी ते जमा करून त्यापासून खत तयार करण्याचा उपक्रमही त्यांनी राबवला. प्राचीन इतिहास आणि भारतीय बौद्ध संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने त्यांनी डोंगरकपारीत कोरलेल्या लेण्यांना भेटी दिल्या. या माध्यमातून चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला तसेच सम्राट अशोक आणि सातवाहन कालखंडातील धम्मलिपीचा अभ्यास केला.
या अभ्यासासाठी नाशिक येथील दानपारमिता फाऊंडेशनचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या सहकार्यामुळे सध्या रत्नागिरीत पालि भाषा आणि धम्मलिपीचे वर्ग विनामूल्य घेतले जात आहेत. पालि भाषेचा एक वर्षाचा ‘डिप्लोमा इन पाली’ हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, मुंबई येथे शिकवला जातो. तसेच हे दोन्ही अभ्यासक्रम भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा रत्नागिरीच्या पालि विभागाच्या सहकार्याने शिकवले जातात.
प्रा. वासनिक यांनी पुरस्कार स्वीकारला, त्यावेळी जयेश जाधव आणि ज्योती खैरमोडे उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष श्री. रमेश मारुती पाटील यांच्या पुढाकारातून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळासाहेब तोरसकर, प्रा. डॉ. राजू श्रीवस्ती, डॉ. उदय अनंत माळगावकर, श्री. काकडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


