(गुहागर)
गुहागर तालुक्यातील नवानगर येथे क्रिकेट खेळताना निर्माण झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. या हल्ल्यात ऋषिकेश नाटेकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून, गुहागर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला केवळ १२ तासांत अटक करून मोठे यश मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळताना ऋषिकेश नाटेकर आणि सत्यजित पटेकर यांच्यात किरकोळ वाद झाला होता. हा वाद सायंकाळी साडेसातच्या सुमारास उफाळून आला. नवानगर येथील भट्टीजवळील पुलावर ऋषिकेश आपल्या मित्रांसह बसलेला असताना, आरोपी सत्यजितने अचानक पाठीमागून ऋषिकेशच्या पाठीत धारदार शस्त्राने वार केला. इतक्यावरच न थांबता त्याने पोटावरही वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित मित्रांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला थांबवले.
हल्ल्यानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. आरोपी सत्यजितने ” तुम्ही मला अजून ओळखत नाही, मी यापूर्वी ही खून केला आहे, मला खून कसा करतात हे चांगले ठाऊक आहे” असे म्हणत शिवीगाळ केली आणि तिथून पलायन केले. मात्र गंभीर जखमी ऋषिकेशला तत्काळ रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे नवानगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांत खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने पथक तयार करून सापळा रचला. केवळ १२ तासांत आरोपी सत्यजित पटेकरला अटक करण्यात आली असून, तो सध्या गुहागर पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील तपास सुरू आहे. या तपासात पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, भोपळे, तसेच पोलिस कर्मचारी प्रितेश रहाटे, राजेश धनावडे, सतीश कुंभार, आशिष फुटक व वैभव चौगुले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
दरम्यान गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. गुहागर पोलीसांनी वेगाने तपास करत आरोपीला फरार होण्यापूर्वीच दाभोळमधुन पकडण्यात आले. यापूर्वी सत्यजित पटेकर यांवर गुहागर पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 302, 397, 201, 120 (ब) व 34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. However आजच्या घटनेचा गुन्हा दाखल करताना पोलीसांनी भा. न्या.सं. 109, 115(2), 118(1), 352, 351 (3), 131 ही कलमे लावली आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उप. निरीक्षक सोनावणे करत आहेत.