(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मे महिन्याच्या उष्णतेच्या झळा फक्त माणसांनाच नव्हे, तर निसर्गातील प्राणी-पक्ष्यांनाही हैराण करत आहेत. अन्न, पाणी आणि निवारा यासाठी संघर्ष करत असलेल्या या मुक्या जीवांकडे बहुतांश वेळा दुर्लक्ष होते. मात्र देवरुखमधील एका हळव्या क्षणी सौ. मेधा जाधव आणि त्यांच्या पती मंगेश जाधव यांनी दाखवलेली जागरूकता आणि करुणा एका घुबडाच्या पिल्लाचे प्राण वाचवणारी ठरली.
ग्रेस लेडीज ब्युटी पार्लरच्या मालकिण असलेल्या सौ. मेधा जाधव या रोजप्रमाणे सायंकाळी पार्लर बंद करून आपल्या पतीसोबत दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या. त्यादिवशी त्यांनी विरंगुळ्यासाठी नेहमीच्या वाटेऐवजी सोळजाई मंदिर मार्गे कांजीवरा रस्त्याने जाण्याचे ठरवले. कांजीवरा तिठ्यानंतर काही अंतरावर अचानक रस्त्याच्या मधोमध काहीतरी पडलेले त्यांच्या नजरेस आले. समोरून येणाऱ्या गाडीच्या प्रकाशात दिसलेले हे दृश्य त्यांना अस्वस्थ करून गेले.
“कुठले पिल्लू तर नाही ना?” असा विचार करत त्यांनी पतीला गाडी थांबवण्यास सांगितले. दोघांनी गाडी मागे वळवली आणि घटनास्थळी पोहोचून पाहिले, तर तेथे एक घुबडाचे पिल्लू अर्धमजल अवस्थेत पडलेले होते. छाती धडधडत होती, भीतीने गोंधळलेले ते पिल्लू हालचालही करत नव्हते. सौ. मेधा जाधव यांनी प्रेमाने त्याला उचलून रस्त्याच्या कडेला नेले आणि सुरक्षित ठिकाणी घेतले.
रात्र झाल्यामुळे उपचारासाठी काय करावे, याचा विचार करत त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील राजा गायकवाड यांच्याशी संपर्क झाला, पण स्थानिक मदतीसाठी ते थांबले. तोपर्यंत घुबडाचे पिल्लू त्यांच्या कुशीत झोपी गेले. सौ. जाधव यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवताच, एक चमत्कार घडला. पिल्लू झपकन उठले आणि भुर्रकन उडून शेजारच्या झाडीत निघून गेले.
क्षणभर थांबलेले श्वास परत सुरू झाले. जणू या मुक्या जीवाने त्यांच्या प्रेमाची परतफेड केली. दोघांनीही परमेश्वराचे आभार मानले आणि समाधानाने घरी परतले. या घटनेने दाखवून दिले की, जर प्रत्येकाने निसर्गप्रेम आणि संवेदनशीलता जपली, तर अनेक जीव वाचवले जाऊ शकतात. सौ. मेधा आणि मंगेश जाधव दाम्पत्याचे हे उदाहरण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावे.