(गुहागर / तवसाळ)
कोकणातील पारंपरिक आणि लोकसंस्कृतीशी निगडीत ‘वाघबारस’ ही प्राचीन प्रथा आजही गुहागर तालुक्यातील तवसाळ पंचक्रोशीतील बाबरवाडी गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.
कार्तिकी द्वादशीचा दिवस हा गुराख्यांच्या देवतेच्या पूजेसाठी पवित्र मानला जातो. या दिवशी चातुर्मास समाप्ती होत असल्याने ग्रामीण भागात गुराखी समाज आपला पारंपरिक “वाघ पिटळणे” कार्यक्रम साजरा करतो.
सालाबादप्रमाणे यंदाही तवसाळ पंचक्रोशीतील वाघबारशी उत्सव भव्यतेने आणि पारंपरिक रीतीने पार पडला. आजच्या धकाधकीच्या युगात जुन्या लोकपरंपरा लोप पावत असल्या तरी या संस्कृतीचे जतन करण्याचे काम आजची तरुण पिढी उत्साहाने करत आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.
उत्सवाच्या निमित्ताने लहान मुलांपासून ते ज्येष्ठ ग्रामस्थांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. महिला मंडळ, नवतरुण युवक व तरुणी यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. या प्रसंगी मुलांना जंगली प्राण्यांचे वेष परिधान करून सजवण्यात आले. शरीरावर पाने, डहाळ्या, भाताचा पेंडा बांधून ‘वाघ’ तयार केला जातो. त्यानंतर गुराख्यांच्या देवतेला नैवेद्य दाखवून “वाघ पिटळणे” हा पारंपरिक विधी साजरा होतो. शेवटी नदीत स्नान करून सर्वजण आनंद लुटतात.
या विधीचा अर्थ असा की, ‘वाघ’ म्हणजे संकटाचे प्रतीक शिमेच्या बाहेर पिटाळून गावाचे रक्षण करणे. यानंतर ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी देवीचे दर्शन घेऊन सर्व गुरांच्या संरक्षणासाठी प्रार्थना केली जाते. ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी देवीला यावेळी विनवणी केली जाते. आपल्या गुरांचं संरक्षण व्हावं, गुरांना सुख, समाधान मिळावं, रानात कुठलीही अडचण येऊ नये, म्हणून हा कार्यक्रम साजरा केला जातो. त्यानंतर सर्व गुरे चरायला सोडून देतात अगदी मे महिन्यापर्यंत तू रक्षण कर, अशी आराधना केली जाते. या कार्यक्रमानंतर सर्वांनी वनभोजनाचा आनंद घेत उत्सवाची सांगता केली.
या वेळी ग्रामस्थ अध्यक्ष संदीप जोशी, तसेच शंकर येद्रे, विजय नाचरे, गणपत येद्रे, मोहन येद्रे, यशवंत नाचरे, गणू येद्रे, अशोक नाचरे, आनंद येद्रे, दिपक येद्रे, दिपक जोशी, ज्ञानेश रसाळ, सचिन येद्रे, अविनाश नाचरे, सुरेश येद्रे, सुरेश नाचरे यांच्यासह महिला मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
अशा प्रकारे वाघबारशी निमित्ताने तवसाळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कोकणची पारंपरिक संस्कृती आणि वारसा जपत ठेवण्याचा एक सुंदर प्रयत्न केला.

