( रत्नागिरी )
शिक्षकांचा आवाज मंत्रालयात पोहोचविण्याच्या हेतुने आखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ संलग्न आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी जिल्ह्याचे अधिवेशन दि. २७/०४/२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता रत्न नगरीत स्वयंवर मंगल कार्यालय माळनाका रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनात शिक्षकांवर लादली जाणारी अशैक्षणिक कामे, संचमान्यते साठी जाचक अटी, जुनी पेन्शन योजना, कॅशलेस मेडिक्लेम योजना, शिक्षण सेवक पद रद्द करणे, शिक्षकां मधून विस्तार अधिकारी पदे भरणे, पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणी, आंतर जिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदल्यात सुधारणा असे अनेक विषय मांडण्यात येणार आहेत.
या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत, राज्याचे गृह, महसूल ग्रामविकास आणि पंचायतराज समिती मंत्री नामदार योगेशजी कदम जिल्ह्यातील आमदार भास्करराव जाधव, किरण शेठ उर्फ भय्या सामंत, शेखरजी निकम तसेच शैक्षणिक कार्यात सहभागी असणारे मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आपली एकजूट दाखवून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी बहू संख्येने उपस्थित रहावे. असे रत्नागिरी जिल्ह्यातील आखिल भारतीय शिक्षक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी यांनी आवाहन केले आहे.