(लांजा / प्रतिनिधी)
गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक कार थेट आंजणारी पुलावरून कोसळून काजळी नदीपात्रात गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी, 25 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 5.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात कारचालक सुदैवाने बालंबाल बचावला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर कार लांजा तालुक्याच्या हद्दीतून जात असताना, आंजणारी पुलावर समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने अचानक हुलकावणी दिल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट पुलावरून खाली कोसळून काजळी नदीच्या पात्रात जाऊन पडली.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि कारचालकाला बाहेर काढले. चालकाला किरकोळ जखमा झाल्या असून त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिक तपास करत आहेत. अपघात घडवून निघून गेलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहे.

