(संगमेश्वर)
तालुक्यातील साखरपा येथील रहिवासी व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व बुधाजी गुणाजी घागरे (वय ८८) उर्फ ‘घागरे गुरुजी’ यांचे शुक्रवारी रात्री राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने साखरपा परिसरातील एका अनुभवी मार्गदर्शकाचा आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
घागरे गुरुजींनी सुमारे चाळीस वर्षे शिक्षण क्षेत्रात समर्पितपणे सेवा बजावली. अध्यापनासोबतच लोककलेचीही त्यांना विशेष आवड होती. मनोरंजन व जनजागृतीची साधने मर्यादित असलेल्या काळात त्यांनी ‘कळसूत्री बाहुल्यांचा खेळ’ या दुर्मिळ लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांचा हा खेळ त्या काळी पंचक्रोशीत अत्यंत लोकप्रिय होता.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रत्नागिरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शिक्षण, कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत अंत्यदर्शन घेतले.
साखरपा येथील काजळी नदीकाठच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, नातू असा परिवार आहे.

