(देवरूख / सुरेश सप्रे)
आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविदयालयाच्या टीम फुल थ्रोटलने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्पर्धा गाजवत घवघवीत यश संपादन केले आहे. कोईम्बतूर (तामिळनाडू) येथे पार पडलेल्या गो कार्ट डीझाइन चॅलेंज स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी केली. इसनी मोटारस्पोर्ट फॉर्मुला गो कार्ट डीझाइन चॅलेंज सिझन बारामध्ये निवड झालेल्या महाविद्यालयाच्या विविध शाखेतील २८ सदस्यीय टीमने विविध किताब पटकावून पुन्हा एकदा महाविद्यालायाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. या सर्वात प्रतिष्ठीतअशा स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या टीमची निवड झाली होती.
गोकार्ट डीझाइन चॅलेंजस्पर्धेमध्ये दरवर्षी शेकडो दिग्गज शैक्षणिक संस्थाच्या विद्यार्थी टीम सहभागी होत असतात. यावर्षी तब्बल ६० हून अधिक टीम या स्पर्धेत उतरल्या होत्या. ही स्पर्धा जनरल मोटर्स, टाटा मोटर्स, होंडा, फोर्ड यासारख्या ऑटोमोबाइल डिझाईन व उत्पादन क्षेत्रातील नामवंत कंपन्यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाते. या स्पर्धेत निवड होण्यासाठी सुरुवातीला तांत्रिक चाचणी, कॉस्ट अँड बिझनेस प्रेझेन्टेशन, डिझाईन प्लान, खर्च मूल्यमापन, ब्रेक टेस्ट यासारख्या विशेष चाचण्या सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात. तसेच इंडूरन्स टेस्ट सारखी शेवटची महत्वाची टेस्टही यावेळी पार करणे गरजेचे असते. विशेष म्हणजे कॉस्ट प्रेझेन्टेशनमध्ये टीमने १० व तर बिझनेस प्लॅन प्रेझेन्टेशनमध्ये ११ व क्रमांक प्राप्त करून अंतिम राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभानंतर रेस, ऑटोक्रॉस, स्किडपॅड यासारखे डायनॅमिक इव्हेंट घेतले गेले. त्यानंतर टीमची गुणवत्ता, तंत्रज्ञान व सर्व टेस्टच्या आधारे टीमला एकूणच चोविसावा क्रमांक घोषित करण्यात आला. देशभरातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी स्पर्धा परीक्षण केले.
टीम कप्तान साक्षी सातोसे हिच्यासह सायली डांगे, समर्थ रेडीज, सृजन शिरकर, रितेश शिंदे, अभिजित, संतोष, साईप्रसाद, आदित्य व इतर विद्यार्थी सदस्यांनी या स्पर्धेसाठी विशेष प्रयत्न केले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर आणि महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली या गो कार्टची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे टीमचे माजी विद्यार्थी सदस्य वैष्णव देवरुखकर व प्रतीक रेवाळे यांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री रविंद्र माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी टीममधील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. टीमच्या या उत्तुंग यशामुळे विवध स्तरातील मान्यवरांकडून महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.