( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुका महसुल विभाग हद्दीतील माखजन करजुवे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी या भागामध्ये अनधिकृतरित्या वाळू उत्खनन (सेक्शन पंपाद्वारे) फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. दररोज शेकडो गाडया या विभागातून सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत वाळूचे उत्खनन करुन वाहतुक केली जात आहे. मात्र विद्यमान तहसिलदार हे या गोष्टीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे. मागे संगमेश्वर पोलीसांनी अनधिकृतरित्या वाहतुक करणा-या गाडयांवर कार्यवाही केली होती. जर सदरची वाहतुक पोलीस खात्याला दिसते व त्यांच्यावर कार्यवाही होत आहे. तर मग महसुल विभागाकडून कार्यवाही का केली जात नाही ? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष परशुराम पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
परशुराम पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, वाळू, चिरा, गौण खनिज उत्खनन हे विद्यमान तहसिलदार आल्यापासुन त्यांच्याच वरदहस्ताने होत आहे. तसेच वाहतुक ही गोर गरीब वाहतुकदार यांच्याकडून कोणत्याही प्रकारची आकारणी न करता वाहतुक पूर्वी होत होती. मात्र महसुल विभाग हे वाहतुकदार यांना वेठीस धरुन मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळून दरमहा हप्ता वसुली करून सदरची व वाहतुक केली जात आहे. मात्र शासनाचे रॉयल्टीद्वारे मिळणारा महसुल बुडत आहे.
तसेच महसुल विभागातील जमिन संदर्भातील स्थळ पहाणी, मागील गणपतीपासुन केली जात नाही. तसेच जमिन जुमल्या संदर्भातील केससाठी माखजन टोकापासुन लोकांचा फक्त चकरा माराव्या लागत आहेत. त्यांचीही कामे वेळीच होत नाहीत. या कारणास्तव तहलिदार यांची व त्यांच्या सहका-यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे मुंबई गोवा महामार्गावर खाजगी जागांमधील माती काढून रॉयल्टी न भरता ती रस्त्याच्या कामासाठी वापरली जात आहे. त्यामुळे शासनाचे नुक्सान होत आहे. तरी प्रत्यक्ष पहाणी करुन शासनाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी विद्यमान तहसिलदार व त्यांचे सहकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी व सदर ठिकाणी सक्षम तहसिलदार यांची नियुक्ती करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.