(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कातळवाडी या शाळेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याने ग्रामस्थ व आजी-माजी विद्यार्थ्यानी अंत्यत आनंदात व उत्साहात सुवर्णमहोत्सव साजरा केला. या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या.
संगमेश्वर तालुक्यात येणाऱ्या फुणगूस तसेच पोचरी या दोन गावांच्या सीमेवर असलेले फुणगूस गावातील कातळवाडी ही डोंगरभागात वसलेली वाडी असून या वाडीत शिक्षणाची सोय व्हावी ही भुमिका त्यावेळच्या ग्रामस्थांची होती. यासाठी सरदेसाई गुरुजी व ग्रामस्थ यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शाळा सुरु करण्यास मंजुरी मिळून 10 जून 1973 साली प्राथमिक शाळेची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे शाळेचे पाहिले मुख्याध्यापक म्हणुन शाळेचा कार्यभार सरदेसाई गुरुजी यांच्याकडे जिल्हा प्रशासनाकडून सोपवण्यात आला होता.
या शाळेला 50 वर्ष पूर्ण झाली असून या पाच दशक पूर्ण केलेल्या कालावधीत सुमारे तेरा शिक्षकांनी विद्यादान करून अनेक विध्यार्थी घडवण्याचे काम केले आहे. प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया समजला जातो. येथूनच प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करून त्यापुढील शिक्षण घेऊन अनेकजण उच्चाशिक्षित होऊन शिक्षक, डॉक्टर, वकील आदी उच्चस्तरीय शिखरावर पोहचले आहेत.
शाळेचा सुवर्णं महोत्सव विविध संस्कृतीक कार्यक्रमानी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडी व पवित्र ज्योतीसह संपूर्ण वाडीमधून प्रभातफेरी ग्रामस्थांच्या व माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाने काढण्यात आली. शाळेच्या माजी – आजी विध्यार्थ्यानी शाळेचा 50वा वाढदिवस केक कापून साजरा केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन याच गावचे सुपुत्र असलेले विजय गुरव गुरुजी व विकास फटकरे गुरुजी यांनी केले, तर शाळेचा माजी विद्यार्थी विद्देश फटकरे याने मोलाची साथ दिली.
सखाराम थुळ गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अशोक पांचाळ सरपंच, श्रीपाल जाधव उपसरपंच, पोलीस पाटील प्रशांत थुळ, भाई गुरव, कोंडये केंद्राचे प्रमुख संतोष मोहिते, कस्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष संतोष कांबळे, फुणगूस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुजित शिगवण यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लाभली. आजपर्यंत या शाळेत ज्यांनी सेवा बजावली अशा शिक्षकांचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून त्यांना निमंत्रित करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये गावडे गुरुजी, चौधरी गुरुजी, पाटील गुरुजी, विशाखा जाधव आदी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.