(चिपळूण)
जिल्ह्यात वाळू बंदी असतानाही चिपळूण तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सुरूच आहे. एकीकडे गोरगरिबांना आपली घरकुले बांधण्यासाठी वाळू मिळत नाही, तर दुसरीकडे बिल्डरांच्या बांधकाम साईडवर वाळूचे ढीग पाहायला मिळत आहेत. या विरोधात येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कांबळी यांनी तहसीलदारांकडे तक्रार दिली असून, थेट १ मे रोजी आत्मदहनाचा इशाराच दिला आहे.
श्रीकांत कांबळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून अवैधरीत्या वाळू वाहतूक सुरू आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी एका महिलेने आवाज उठविला असता त्यांना मारहाण करण्यात आली. भविष्यात आमच्यासारख्या समाजसेवकावरही हल्ले होण्याची शक्यता आहे. त्यावर अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळेच आजही वाळू वाहतूक सुरूच आहे. याबाबत तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता अशी वाहतूक सुरू नाही, असे सांगण्यात येते. परंतु, प्रत्यक्ष चिपळूण शहरात व तालुक्यात फिरत असताना अनेक बिल्डरांच्या इमारतीमध्ये वाळूचे ढीगच्या ढीग रचलेले दिसतात. परंतु, सर्वसामान्यांना शासनाचे वाळू धोरण जाहीर असतानाही घरकुलासाठी वाळू दिली जात नाही, असे कांबळी यांनी म्हटले आहे.
ज्या ठिकाणी वाळू व्यवसायाची ठिकाणे आहेत त्यांची पाहणी करून सील करावीत आणि त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. याबाबत कार्यवाही झाली नाही तर १ मे रोजी ज्या ठिकाणी वाळू उत्खनन होते. त्या नदीपात्रात आत्मदहन करण्याचा इशारा कांबळी यांनी दिला आहे.