( चिपळूण )
तालुक्यातील तीन सहकारी सेवा सोसायट्यांमध्ये तब्बल ५५ लाखांचा अपहार करणाऱ्या सचिवाला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अटक झालेल्या सचिवाचे नाव योगेश प्रमोद भोबेकर (रा. मालदोली) असे आहे.
भोबेकर हे कालुस्ते, मालदोली आणि भिले या तीन सोसायट्यांमध्ये सचिव म्हणून काम करत होते. यापूर्वी भोम सोसायटीत झालेल्या लेखापरीक्षणात त्यांनी सुमारे १७ लाखांचा अपहार केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे या सोसायट्यांमध्ये त्यांनी एकूण ५५ लाखांहून अधिक रक्कम अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सहायक निबंधक कार्यालयाने सोसायट्यांच्या तपासणीदरम्यान दप्तर उपलब्ध नसल्याचे आढळून आले होते. जिल्हा बँकेला एप्रिल महिन्यात थकित कर्जाची रक्कम भरली गेली नसल्याचे लक्षात आले. चौकशीत भोबेकर यांनीच ५५ लाखांची वसूल केलेली रक्कम वैयक्तिक कारणासाठी वापरल्याचे लेखी कबूल केले.
या गैरप्रकारानंतर सहकार विभागाने भिले, मालदोली आणि कालुस्ते या तिन्ही सोसायट्यांच्या संचालक मंडळाला अपात्र ठरवून बरखास्त केले आहे. संबंधित दप्तर जप्त झाल्यानंतर लेखापरीक्षण पूर्ण होणार असल्याची माहिती सहायक निबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

