(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील गुहागरच्या किनाऱ्यावर समुद्राच्या लाटांशी नातं सांगणाऱ्या ऑलिव्ह रिडले जातीच्या तीन मादी कासवांनी एकाच हंगामात पुन्हा अंडी घालण्याचा दुर्मिळ नमुना दाखवत सागरी जैवविविधतेच्या अभ्यासात महत्त्वाची भर घातली आहे. ‘कांदळवन कक्ष – दक्षिण कोकण विभागा’च्या निरीक्षणानुसार, या कासवांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात घरटी करून अंडी घातल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत पुन्हा त्याच किनाऱ्यावर येऊन अंडी घालण्याचे दुर्मिळ दृश्य घडवले.
‘भारतीय वन्यजीव संस्थान’ (WII) आणि ‘कांदळवन कक्ष – दक्षिण कोकण विभाग’ यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांचे फ्लिपर टॅगिंग अभियान राबवण्यात आले होते. या मोहिमेत मादी कासवांच्या परांवर विशिष्ट क्रमांक असलेले धातूचे पट्टे लावण्यात आले, जे त्यांच्या हालचालींचे दस्तावेजीकरण आणि पुनरागमनास ओळख देण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. एकूण ६२ मादी कासवांमध्ये सर्वाधिक ५९ गुहागरच्या किनाऱ्यावर टॅग करण्यात आल्या.
विशेष म्हणजे, टॅग क्रमांक १११४३-१११४४, १११२७-१११२८ आणि ११२०१-११२०२ या तिन्ही माद्यांनी आपले पहिले अंड्यांचे घरटे फेब्रुवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात केले, तर दुसरे घरटे फेब्रुवारीच्या शेवटच्या आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात घातले. ही पुनरावृत्ती ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांमध्ये संभाव्यतः नैसर्गिक सवयीचा भाग असल्याचे संकेत देत आहे.
यापूर्वी ओडिशा येथे टॅग केलेली एक मादी जानेवारी २०२५ मध्ये गुहागरच्या किनाऱ्यावर अंडी घालताना आढळली होती. तसेच, ‘सावनी’ नामक मादीने आंजर्ले ते केळशी या किनारी प्रवास करत अंडी घालण्याची नोंद झाली होती.
या संदर्भात ‘कांदळवन कक्ष – दक्षिण कोकण’ विभागाच्या विभागीय वन अधिकारी कांचन पवार म्हणाल्या, “फ्लिपर टॅगिंगच्या माध्यमातून केवळ कासवांचे पुनरागमनच नव्हे तर त्यांच्या विणीच्या चक्रातील बदल, अंड्यांची संख्या, कालावधी आणि सागरी परिस्थितीशी असलेले नाते अधिक बारकाईने समजून घेता येते. ही माहिती संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने अमूल्य आहे.”
गुहागरच्या किनाऱ्यावरील या अभूतपूर्व नोंदी सागरी जैवविविधतेच्या संशोधनात नवे क्षितिज उघडणाऱ्या ठरल्या असून, त्यातून फ्लिपर टॅगिंगसारख्या उपाययोजनांचे महत्त्व अधोरेखित होते.