(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील निवळी हातखंबा येथील प्रसिद्ध व्यावसायिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील जाणकार हरहुन्नरी आणि जिद्दी व्यक्तिमत्त्व कृष्णकांत उर्फ भाई जठार यांनी यावर्षी. इ.१२ वी बोर्ड परीक्षेचा १७ नंबर चा फॉर्म भरून ते बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपले शैक्षणिक स्वप्न साकार केले आहे. आता एल.एल.बी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भाई जठार हे हातखंबा हायस्कूलमधून १९८८ साली इ.१० वी, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतले. अभ्यासाबरोबरच कबड्डी, क्रिकेट, बास्केटबॉल, हॉकी अशा अनेक खेळांमध्ये त्यांनी त्यावेळी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी करून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आपल्या खिलाडू वृत्तीने कर्तृत्वाची व नेतृत्वाची विशेष चमक दाखवली.एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ते ओळखले जात. सदैव खेळांत रममाण होणारे कृष्णकांत उर्फ भाई जठार यांचे सन १९९० साली बारावी परीक्षा कालखंडात खेळांतील स्पर्धांमुळे थोडेसे इंग्रजी विषयाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे त्यांचा इंग्रजी विषय राहिला होता. यामध्ये गेली ३४ ते ३५ वर्षांचा काळ गेला असला तरी भाई जठार यांची आंतरीक जिद्द, चिकाटी, शैक्षणिक तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणावर त्यांची फार मोठी निष्ठा आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील ते नेहमीच मग्न असतात. कामांचा व्याप असतानाही ते मनातील स्वप्न आजतागायत विसरले नाहीत.
फेब्रुवारी/ मार्च २०२५ या वर्षात त्यांनी बोर्ड परीक्षेमध्ये १७ नंबरचा बाहेरून फॉर्म भरून त्यांनी मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्थेच्या चाफे येथील सुनिल मुरारी मयेकर कनिष्ठ महाविद्यालयातून इंग्रजी विषयाची जिद्दीने परीक्षा देऊन ते ५१ टक्के गुण मिळवून ते जाकादेवी येथील परीक्षा केंद्रातून ते यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. युट्युब वर बारावी बोर्ड परीक्षेच्या इंग्रजी विषयाच्याअनेक प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका परीक्षेपूर्वी एक महिना अतिशय समजून घेऊन वेळेचे नियोजन करून प्रामाणिकपणे अभ्यास केला, त्यामुळेच मी माझी ध्येयपूर्ती करू शकलो, असेही ते आवर्जून सांगतात.
शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, शिक्षण व उदिष्ट कधीच संपत नाही, त्यासाठी प्रचंड ध्येयवादी असावे लागते, या स्फुर्तिदायक विचाराने त्यांनी आपण एल.एल.बी. करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. भाई जठार यांना आपल्या कुटुंबियांची प्रेरणा मिळाली. इ.१२ वी बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून भाई जठार यांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखित करून आजच्या पिढीला, तरुणांना शिक्षणाकडे वळण्याचा एक चांगला संदेश परीक्षेच्या माध्यमातून दिला आहे, ही बाब सर्व स्तरातील अध्ययनार्थींना प्रेरणादायी आहे.