(देवरुख)
आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘टीम फुल थ्रोटल’ने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथील करी मोटर स्पीडवे येथे पार पडलेल्या ‘इसनी मोटारस्पोर्ट फॉर्मुला गो-कार्ट डिझाइन चॅलेंज – सिझन १३’ या प्रतिष्ठित स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघाने चमकदार यश मिळवले.
महाविद्यालयातील विविध शाखांमधील १८ विद्यार्थ्यांच्या या संघाने स्पर्धेतील अनेक आव्हाने यशस्वीरीत्या पार करत देशपातळीवर बारावा क्रमांक पटकावला, तर महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या संघांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. याशिवाय ‘सेल्स पिच चॅलेंज’ या प्रकारातही संघाने पाचवा क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांच्या शेकडो संघांमधून निवड झालेल्या एकूण ५९ संघांनी यंदाच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑटोमोबाईल डिझाइन व उत्पादन क्षेत्रातील नामांकित कंपन्यांच्या तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेपूर्वी तांत्रिक चाचणी, कॉस्ट अँड सेल्स पिच, डिझाइन प्लॅन, खर्च मूल्यमापन, ब्रेक टेस्ट आदी टप्पे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. अंतिम टप्प्यात ‘इंड्युरन्स टेस्ट’सह प्रत्यक्ष रेस, ऑटोक्रॉस आणि स्किडपॅड यांसारखे डायनॅमिक इव्हेंट आयोजित करण्यात आले.
या सर्व चाचण्यांमधील कामगिरी, तांत्रिक गुणवत्ता आणि सादरीकरणाच्या आधारे अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. विविध स्टॅटिक व डायनॅमिक इव्हेंट्समध्ये संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत एकूण गुणांच्या आधारे ही उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
टीमचे कर्णधार रितेश शिंदे यांच्यासह उपकर्णधार सृजन शिरकर, अभिजीत देवरुखकर, ओंकार भुवड, आदित्य पाटणकर, संतोष तांबे, सुजल जाधव, पार्थ खामकर, साईप्रसाद वरक, विशाल पाटील, तन्मय मयेकर, ओंकार पाटील, साहिल साळवी, प्रतीक गावडे, अपेक्षा हेलोडे, राजनंदिनी गदाले, वृष्चिका मसुरकर आणि प्राजक्ता चव्हाण यांचा संघात समावेश होता.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर गो-कार्टची निर्मिती केली. या संपूर्ण प्रक्रियेत प्राध्यापक डॉ. अच्युत राऊत आणि श्रवण करकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री रविंद्र माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, संस्थेचे सीईओ प्रद्युम्न माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी संघातील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. टीमच्या या यशामुळे विविध स्तरांतील मान्यवरांकडून महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

