(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
गणरायाचा आवडता नैवेद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोदकाला कलाविष्काराचे माध्यम बनवत देवरुखच्या प्रसिद्ध रांगोळीकार विलास राहटे यांनी यंदाच्या गणेशोत्सवात आगळीवेगळी कलाकृती साकारली आहे. चिमुकल्या मोदकांवर अष्टविनायकांची रूपे रेखाटून त्यांनी भक्ती, परंपरा आणि सूक्ष्म कलाकौशल्याचा अनोखा संगम साधला आहे. आकाराने लहान असलेल्या या मोदकांवरील बारकाईने साकारलेली चित्रे पाहून गणेशभक्तांचे लक्ष वेधले जात आहे.
गणेशोत्सव आणि मोदक यांचे नाते अतूट. बाप्पाच्या आगमनाबरोबर घराघरांत मोदकांचा सुगंध दरवळतो. याच पारंपरिक नैवेद्याला कलात्मक रूप देण्याची कल्पना राहटे यांनी प्रत्यक्षात साकारली. अत्यंत लहान आकाराच्या मोदकांवर अष्टविनायकांची चित्रे रेखाटणे ही केवळ चित्रकलेची किमया नसून त्यासाठी विलक्षण एकाग्रता, संयम, अचूक हातोटी आणि कल्पकतेची आवश्यकता आहे. मोरगावचा मयूरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, ओझरचा विघ्नेश्वर आणि रांजणगावचा महागणपती या अष्टविनायकांचे दर्शन या चिमुकल्या मोदकांवर घडते. प्रत्येक गणेशरूपाची स्वतंत्र ओळख आणि वैशिष्ट्य सूक्ष्म रेषांमधून जपण्याचा प्रयत्न राहटे यांनी केला आहे.
मोदकाचा आकार लहान; मात्र त्यावर साकारलेली कलाकृती थक्क करणारी आहे. अत्यंत बारकाईने केलेल्या या चित्रकामातून राहटे यांनी सूक्ष्म चित्रकलेतील आपली हातोटी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. गणरायाला अर्पण केला जाणारा मोदक केवळ नैवेद्य न राहता अष्टविनायकांच्या भक्तीचे माध्यम बनला आहे. रांगोळी आणि सूक्ष्म कलाकृतींसाठी परिचित असलेल्या विलास राहटे यांच्या कलाकृतींमध्ये कल्पकतेला विशेष स्थान आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी काहीतरी वेगळे साकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहटे यांनी यंदा थेट गणरायाच्या आवडत्या मोदकालाच आपल्या कलेचे कॅनव्हास बनविले आहे.
महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत अष्टविनायकांना विशेष स्थान आहे. या श्रद्धेला गणरायाच्या आवडत्या नैवेद्याशी जोडत राहटे यांनी साकारलेली ही कलाकृती भक्ती आणि कलेचा अनोखा मिलाफ ठरते. एका छोट्याशा मोदकावर महाराष्ट्राच्या आठ प्रमुख गणेशक्षेत्रांचे दर्शन घडविण्याची कल्पना आणि तिची बारकाईने केलेली अंमलबजावणी यामुळे या कलाकृतीला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात ही कलाकृती पाहणाऱ्या भाविकांचे लक्ष स्वाभाविकपणे या चिमुकल्या मोदकांकडे वेधले जात आहे. ‘मोदकावर अष्टविनायक!’ ही कल्पनाच अनेकांसाठी कौतुकाचा विषय ठरत आहे. भक्तीला कलात्मक अभिव्यक्तीची जोड देत विलास राहटे यांनी यंदाच्या गणेशोत्सवात आकाराने चिमुकला; पण आशयाने मोठा असा हा अनोखा कलाविष्कार भक्तांना अर्पण केला आहे.


