( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी खंडाळा अर्बन बँक पुरस्कृत क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिर दिनांक 22 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विचारे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कऱण्यात आले. उद्घाटनप्रसंगी संस्थेचे खजिनदार दिवाकर जोशी, प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी जगताप, पर्यवेक्षक आनंदा पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी व खेळाडू उपस्थित होते.
या क्रीडा शिबिराचे खास वैशिष्ट म्हणजे खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक यांची उपस्थिती लाभली आहे. यामधे संस्कार हारगुले व सागर कोळी हे दोन्ही प्रशिक्षक उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष डॉ. राजेंद्र विचारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हे दोन्ही प्रशिक्षक तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. राजेश जाधव व पल्लवी बोरकर यांचे पूर्ण शिबिरामध्ये सर्व खेळाडूंना मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबिरामध्ये खेळाडूंना डॉजबॉल, हॉलिबॉल, क्रिकेट तसेच शारीरिक फिटनेस यासंदर्भात सखोल असे मार्गदर्शन मिळणार आहे. या प्रसंगी डॉ. राजेश जाधव यांनी आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वाने सर्व खेळाडूना आपल्या जीवनातील खेळाचे महत्व पटवून दिले व त्यासाठी आवश्यक असलेली जिद्द, मेहनत व शिस्त खेळाडूच्या अंगी असायलाच हवी असे त्यांनी सांगितले.
या संपुर्ण शिबिराचे आयोजन व नियोजन संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्रीडाशिक्षक डॉ. राजेश जाधव व पल्लवी बोरकर यांनी केले आहे. या उद्घाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर धोपट यांनी केले. या शिबिराचा लाभ परिसरातील शाळांच्या विद्यार्थी खेळाडूंनी बहुसंख्येने घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने कऱण्यात आले आहे.