(रत्नागिरी)
चिपळूण तालुक्यातील आंबतखोल परिसरातील जंगलात आढळलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेला गोवा बनावटीच्या मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पकडला आहे. या साठ्याची एकूण किंमत तब्बल २१ लाख ६६ हजार रुपये इतकी असून, सदर मद्यसाठा बेवारस अवस्थेत आढळला आहे. या साठ्याचा नेमका मालक कोण, याचा शोध सध्या सुरू आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता, गोवा बनावटीच्या मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक विशेष लक्ष ठेवून आहे. याच पार्श्वभूमीवर आंबतखोल येथील जंगलात “सुखकर्ता कात उद्योग” या कंपनीच्या कुलूपबंद पत्र्याच्या शेडमध्ये मद्यसाठा लपवून ठेवण्यात आला असल्याची माहिती अधिकार्यांना मिळाली.
या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमित पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक गणेश जाधव, सचिन यादव आणि जवान मानस पवार, वैभव सोनावले, मलिक धोत्रे यांनी संयुक्तपणे मंगळवारी छापा टाकला. तपासणीदरम्यान, सदर शेडमध्ये गोवा बनावटीच्या ३०० बॉक्स आढळून आले. कोणतीही वैध परवानगी नसल्याने हा साठा तात्काळ जप्त करण्यात आला. छाप्यावेळी ठिकाणी कोणताही व्यक्ती उपस्थित नव्हता, त्यामुळे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास निरीक्षक अमित पाडळकर हे करत आहेत.